जळगाव : गेल्या सात आठ महिन्यांपासून रखडलेला इ-लर्निंगचा कंत्राट जि.प.प्रशासनाने अखेर पुणे स्थित तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा.लि. यांना देण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी घेतला. सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दुपारी इ-निविदा प्रक्रियेतून आलेले तांत्रिक व व्यावसायिक पाकिटे फोडली. आलेल्या हरकती लागलीच फेटाळल्या आणि सायंकाळी तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा.ली.यांना एका शाळेत ९९ हजार ९९२ रुपयात इ-लर्निंगचा प्रकल्प उभा करण्यासंबंधीचे कंत्राट दिले. निविदा मागविल्या, नंतर लटकला७५ लाख रुपयात इ-लर्निंग कार्यक्रम राबविण्यासाठी जि.प.च्या तत्कालीन सीईओ शीतल उगले यांच्या काळात इ- निविदा काढली. पहिल्या वेळेस फक्त दोन निविदा पात्र ठरल्या. तीन निविदा पात्र नसल्याने दुसर्यांना निविदा प्रक्रिया राबविली. दुसर्यांदा फक्त एकच निविदा पात्र ठरली. त्यामुळे तिसर्यांदा इ-निविदा काढली. तिसर्यांदा ही प्रक्रिया होत असतानाच उगले या दीर्घकालीन रजेवर गेल्या. तिसर्यांदा नियमानुसार पात्र ठरणार्या निविदाधारकाला कंत्राट द्यायला हवे होते. पण प्रभारी राजमध्ये हा कार्यक्रम अडकला. पांडेय आले, कार्यक्रम सुरूसीईओपदी पांडेय आल्यानंतर इ-लर्निंगची निविदा २६ जानेवारीला निघाली. पण कार्यक्रमात बदल केले गेले. त्यात ७५ लाखांचा कार्यक्रम ४९ लाख ९९ हजार ९१0 रुपयावर आणला. स्थायी समितीमध्ये मंजुरी घेण्याच्या दृष्टीने अशी किंमत ठरविली. अर्थातच यामुळे या निधीतून आता प्रत्येक तालुक्यात फक्त तीन शाळांमध्ये इ-लर्निंग कार्यक्रम राबविता येईल. त्याला मात्र शिक्षण संचालक आणि जि.प.च्या सभांची मंजुरी घेतली नाही. पूर्वीच्या ७५ लाखांच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी त्यात बदलही करू शकत नाही, असे असताना इ-लर्निंग कार्यक्रमाचा निधी कमी केला गेला. आता तर जि.प.च्या सर्वोच्च स्थायी समितीची मंजुरी न घेता निविदा मागविल्या, त्या उघडल्या आणि कंत्राटही दिले. या मॅरेथॉन कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाच निविदाधारकपाच निविदा होत्या. त्यात सम कन्सेप्ट टेक्नॉलॉजी, पुणे, तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा. ली., पुणे, मायक्रोवेव्ह कॉम्प्युटर अँण्ड मल्टी सव्र्हीसेस, बुलडाणा, मायक्रो हर्ट कॉम्प्युटर अँण्ड पॅरिफरल, बुलडाणा, कोअर इन्फोसीस, जळगाव यांचा समावेश आहे. सुट्टीच्या दिवशी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याबाबतही सदस्यांमध्ये टिप्पणी सुरू आहे.
निविदा निवडीसंबंधी सम कन्सेप्ट टेक्नॉलॉजी, पुणे यांनी हरकत घेतली, पण ती सीईओंनी लागलीच फेटाळली आणि कंत्राट देण्याची कार्यवाही केली. ही प्रक्रिया होत असताना इतर वरिष्ठअधिकारी उपस्थित होते. तीन निविदाधारकांचे एकच प्रमाणपत्र निविदा प्रक्रियेतील अट क्र. २४ व २६ साठी आवश्यक शासनाच्या मान्यता पत्रासंबंधीही प्रश्न आहेत. त्यात या अटींसाठी जे प्रमाणपत्र तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे यांनी जे पत्र दिले आहेत तेच पत्र मायक्रोवेव्ह कॉम्प्युटर अँण्ड मल्टी सव्र्हीसेस, बुलडाणा, मायक्रो हर्ट कॉम्प्युटर अँण्ड पॅरिफरल, बुलडाणा यांनीही सादर केले आहेत. यामुळे तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे व बुलडाणा येथील दोन्ही संस्थांचा काय परस्पर संबंध आहे?हा मुद्दाही उपस्थित झाला आहे. २५ लाखांनी निधी केला कमी जिल्हाभरातील १५ तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांमध्ये इ-लर्निंग उपक्रम सुरू करण्यासंबंधी जिल्हा नियोजन मंडळाने गेल्या वर्षी ७५ लाख रुपये मंजूर केले होते. त्यास तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली होती. मात्र तो ४९ लाख ९९ हजार ९१0 रुपयात करण्यात आला. तिरूंबा टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे यांना इ-लर्निंगचे कंत्राट दिले आहे. या कंपनीकडे आणखी कमी दरात इ-लर्निंगचा कार्यक्रम राबविण्यासाठी मागणी केली आहे. मंजुरी देताना अद्याप स्थायी समितीची मंजुरी घेतलेली नाही, पण स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी घेतली जाईल.
-----------
एका कंपनीने हरकत घेतली होती, पण त्या कंपनीचे आक्षेप नियमात बसत नव्हते. त्यामुळे ते विचारात घेतले नाहीत. ई-लर्निंग निविदा प्रक्रिया राबविताना व कंत्राट देताना आम्ही नियुक्त केलेल्या समितीने सर्व नियमांचे पालन केले आहे. -आस्तिककुमार पांडेय, सीईओ, जि.प.