सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाढदिवस, यश-निवड, उद्घाटन, शैक्षणिक यांसह विविध कंपन्यांच्या जाहिरातीच्या फलकांनी शहरातील प्रत्येक रस्ते आणि चौक सजलेले आहेत. मात्र, मुदत संपूनही मनपातर्फेही हे फलक काढण्यात येत नसल्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. विशेष म्हणजे सहा-सहा महिने उलटूनही हे फलक न काढल्यामुळे, अनेक फलक फाटून, लोंबकळलेल्या अवस्थेत दिसून आले. एकीकडे संबंधित जाहिरातदार हे फलक काढत नसतांना, दुसरीकडे मनपातर्फेही कारवाई होत नसल्यामुळे, शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
मनपाच्या वसुली विभागातर्फे शहरात होर्डिंग लावण्याची परवानगी दिली जात असून, ५० पैसे स्क्वेअर फूट व ५० पैसे जाहिरात शुल्क या प्रमाणे भाडे आकारले जाते. तसेच परवानगी देताना शहर वाहतूक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊनच परवानगी दिली जाते. तसेच परवानगी देतांना संबंधित जाहिरातदाराची एक प्रत अतिक्रमण विभागालाही दिली जात आहे. मनपा वसुली विभागाने जून ते ९ सप्टेंबरपर्यंत शहरात १२२ होर्डिंगला परवानगी दिली असल्याचे वसुली विभागातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
या ठिकाणांकडे कोण लक्ष देणार?
- `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत स्वातंत्र्य चौक ते कोर्ट चौकापर्यंत असलेल्या दुभाजकांमध्ये अनेक लहान आकाराचे मुदत संपलेले होर्डिंग फाटलेल्या अवस्थेत दिसून आले.
- नेहरू चौकाकडून टॉवर चौकाकडे जाताना एका झाडाला लावलेला शैक्षणिक प्रवेशाचा फलकही मुदत संपूनही हटविण्यात आला नसल्याचे तेथील एका व्यावसायिकाने सांगितले.
- तसेच नेहरू चौकातून रेल्वे स्टेशनकडे जातांना वर्षभरापासून मुदत संपलेले वाढदिवसाचे होर्डिंग फाटून, दुभाजकात पडलेले दिसून आले. असे असतानाही मनपाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
इन्फो :
कारवाईची जबाबदारी अतिक्रमण विभागाची
- किरकोळ वसुली विभागातर्फे फलक लावण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर, त्या परवानगीची एक प्रत अतिक्रमण विभागालाही देण्यात येते.
- अतिक्रमण विभागातर्फे शहरातील विविध फलकांची पाहणी करून, मुदत संपलेल्या फलकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
- अतिक्रमण विभागातर्फे वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या कारवाई मोहिमेत, दर महिन्याला ५० ते ६० फलक जप्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
काय होऊ शकते कारवाई
-मनपातर्फे होर्डिंगची परवानगी देण्यात आल्यानंतर, संबंधितांना दिलेल्या तारखेनंतर होर्डिंग काढण्याचींही सूचना केली जाते.
-जर एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने मुदत संपल्यानंतर, फलक न काढल्यास मनपातर्फे तो फलक जप्त करून, दंडात्मक कारवाई केली जाते.
- गेल्या काही महिन्यांत मनपाने मुदत संपुनही फलक न काढलेल्या ६३ नागरिकांना नोटीस, बजावून लावलेल्या अतिरिक्त दिवसांचे शुल्क दंड स्वरूपात आकारले असल्याचे वसुली विभागातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
अधिकारी म्हणतात..
वसुली विभागाने होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्यानंतर, एक प्रत अतिक्रमण विभागालाही दिली जाते. त्यानंतर मुदत संपलेल्यांवर अतिक्रमण विभाग कारवाई करतो. सध्या ज्या ठिकाणी मुदत संपलेले फलक आहेत, ते फलक जप्त करण्याबाबत अतिक्रमण विभागाला सूचना देण्यात येतील.
नरेंद्र चौधरी, अधीक्षक, किरकोळ वसुली विभाग
-