अमळनेर : तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पारधी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत बेघर लोकांना साडेसात हजार घरे देण्याचे तालुका पंचायत समितीचे उद्दिष्ट असून सुमारे ३ हजार ८४० घरे पूर्ण झाली असून नागरिकांना ती रहिवासासाठी देण्यात आली आहेत.
२०१६ ते २०२१ या पाच वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य व्यक्तींसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ५ हजार ९१४ घरांचे उद्दिष्ट आहे. त्यातील २९८९ घरे पूर्ण झाली आहेत तर २२२८ घरे अपूर्ण आहेत. शबरी आवास योजना तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती, आदिवासी लोकांसाठी शबरी आवास योजनेंतर्गत ५४१ घरांचे उद्दिष्ट आहे. नोंदणी मात्र ६५५ लोकांची झाली आहे. त्यात ३५६ घरे पूर्ण झाली आहेत तर १८५ अपूर्ण आहेत. रमाई घरकूल योजना अनुसूचित जाती मागासवर्गीय लोकांसाठी रमाई घरकूल योजना आहे. त्यासाठी ८६१ घरचे उद्दिष्ट आहे तर ९१८ जणांची नोंदणी झाली आहे. ३९२ घरे पूर्ण झाली आहेत. ४६९ घरे अपूर्ण आहेत. पारधी आवास योजना ही योजना फक्त पारधी समाजासाठी असून २०१६ ते २०१९ या तीन वर्षासाठी १२४ घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १०३ घरे पूर्ण झाली आहेत तर २१ घरे अपूर्ण आहेत. तालुक्याची ग्रामीण भागात लोकसंख्या १ लाख ९२ हजार असून ७ हजार ४४० कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट आहे. ७ हजार२२४ लोकांनी नोंदणी केली आहे. ६ हजार ८८९ लोकांची जिओ टॅगिंग झाली आहे. बँक खाते तपासून ६ हजार ४५४ लोकांना मंजुरी दिली आहे. ६ हजार १८८ लोकांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. ३ हजार ८८४ लोकांनी घरे बांधून घेतली आहेत त२ हजार ९०३लोकांची घरे अपूर्ण आहेत. प्रत्येक व्यक्तीजवळ किमान २६९ स्क्वेअर फूट जागा असावी किंवा त्यांना गावठाण , ग्रामपंचायतमार्फत जागा दिली जाते किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेत ५० हजार रुपये दिले जातात. प्रत्येकाला एकूण दीड लाख रुपये अनुदान दिले जाते.
पैसे घेतले, पण बांधकाम नाही
अनेक लोकांनी पहिला हप्ता घेऊनही घरे बांधलेली नाहीत. अमळनेर तालुक्यात महाराष्ट्रात सर्वप्रथम सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सर्व घरे व वास्तू एकाच प्रकारची दिसावी म्हणून ग्रामपंचायती, घरकुले याना मरून आणि स्किन कलर देण्यात आली आहेत.
१९-२० मध्ये घरकूल योजनेत अमळनेर तालुका नाशिक विभागात प्रथम आला होता. महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्याचा उल्लेख यशोगाथा सदरात केला होता. ज्या लाभार्थींनी पहिला हप्ता घेऊनही घर बांधलेले नाही त्यांनी त्वरित घर बांधावे अन्यथा हप्ता परत घेतला जाऊ शकतो.
- संदीप वायाळ, सहाययक गटविकास अधिकारी,