पाल, ता. रावेर : काय नाही, त्यापेक्षा काया आहे... हे पाहिले असता नसल्याची खंत न वाटता आहे त्या परिस्थितीवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. असाच प्रत्यय येथील तिघा दिव्यचक्षू बंधुंनी दिला आहे. जन्मापासून या तिघांना दृष्टी नाही. तरीही हे अनेक कामे स्वत: करीत असून, बकऱ्या चारणे व पाला तोडून विकणे आदी कामे ते करीत असल्याने गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय ठरले आहेत.
अंधमय काळोखाला आपल्या कर्माच्या जोरावर दूर सारणारे अक्रम, आबीद व अशपाक हे तिघे सख्खे भाऊ लहानपणापासून नेत्रहीन आहेत. घरात आई, मोठा भाऊ आशिक व तीन बहीण असा त्यांचा मोठा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच दोन बहिणींचे लग्न झाले आहे. मोठा भाऊ आशिक हा गावात जे काम मिळेल ते काम करून घराचा खर्च पेलत आहे.
अक्रम, आबीद व अशपाक यानां डोळ्यांनी काहीच दिसत नसताना ते जंगलात जाऊन बकरीसाठी रोज पाला आणतात. कोणाचीही मदत न घेता झाडावर चढून पाला तोडणे व काही वेळेस विकणे हा त्यांचा दिनक्रम आहे.
दोघा भावांना अजूनही योजनेचा लाभ नाही
घरची परिस्थिती हलाखीची असून, फक्त अक्रम यास सहाशे रुपये प्रती महिना शासनाकडून मदत मिळायची आता ती रक्कम वाढली असून, प्रती महिना शासनाकडून दोन हजार रुपये मिळतात. तेही कधी कधी वेळेवर मिळत नाही, असे अक्रम सांगतो आबीद व अशपाक या दोघा भावडांना शासनाकडून अद्याप काही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांनाही मदतीची अपेक्षा आहे.नेत्रहीन असूनही स्वत:ला कुठल्याही प्रकारे कमी न समझता जिद्दीने आपला ससांराचा गाडा चालवतात.
निसर्गाच्या सानिध्यात मिळतो आनंद
दृष्टी नसली तरी त्यांचे कान हे एकप्रकारे दृष्टीचे काम करतात. बारीकसारीक आवाज ते टिपतात. जंगलात त्यांचे मन थोडे मोकळे होते. पक्ष्यांचा किलबिलाट व नदीनाल्यातील वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज हे त्यांना खूप आवडतं. तर अशपाकला यासह लता मंगेशकर यांची गाणी खूपच आवडतात.
मतदानाचा हक्कही बजावतात
दृष्टी नसल्याने तिघा भावंडांनी शाळेत पायच ठेवला नाही. असे असताना ते मतदानाचा हक्क नियमितपणे बजावतात.
पोलिसांना बोलावून त्यांच्या मदतीने ईव्हीएम मशीनचे बटन दाबून ते मतदान करतात.
आवाजावरून ओळखतात...
गावातील प्रत्येकाची नावेही या तिघा भावांना पाठ आहेत. प्रत्येकाला ते आवाजावरून ओळखतात. यामुळे तिघांचेही मित्र गावात असून, त्यांच्याशी गप्पा करणेही त्यांना आवडते. गावात या तिघा भावडाची
लॉकडाऊनमध्ये प्रचंड हाल
कोरोनामुळे लॉकडाऊन लागले असता घरात जेवढा पैसा होता तेवढा संपला. २० दिवस पुरेल एवढे राशन मोफत मिळाले. मात्र किराणासाठी पैसाच उरला नव्हता.
एकाला गावात काम नाह, तर तिघे आंधळे काय करायचे? असा प्रश्न असताना एका किरणा दुकानदाराने उधार माल दिला व ती उधारी अजूनही ते फेडत आहे. मेहनतीने जीवनात काही प्रमाणात जीवनातील अंधार तर दूर झाला आहे, मात्र खऱ्या सुखाचा उजेड कधी पडेल हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.