जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह एसएमएस संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत श्रमदान करून अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. हे श्रमदान महाविद्यालयाच्या आवारात मध्यवर्ती ग्रंथालय तथा दिव्यांग बोर्डाच्या परिसरात करण्यात आले. खडबडीत झालेली जागा तसेच पावसामुळे तुंबलेले पाणी यावर परिसरातील खडी, मातीचा वापर करून सपाटीकरण करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ग्रंथालय आहे. या ठिकाणी दिव्यांग मंडळाचे दर बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी कामकाज चालते. तसेच विद्यार्थ्यांसाठी अध्ययन करण्यासाठी ग्रंथालय खुले करण्यात आले आहे. शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी सकाळी ७ ते १० या वेळेत श्रमदान केले.
या श्रमदानात स्वतः अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. इम्रान तेली, डॉ. संदीप पटेल, डॉ. वैभव सोनार, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. अलोक यादव, विश्वजित चौधरी, महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेचे जनरल सचिव तेजस शिंदे, एसएमएस संस्थेचे अजय जाधव सहभागी झाले होते.