संजय हिरे
खेडगाव, ता. भडगाव : आधीच अतिपावसामुळे खरिपातील पिकांना पाणी अधिक झाले आहे. हे कमी की काय? जामदा डावा कालव्याला सोडलेल्या पाण्याच्या पाझरामुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यांतील कालव्याखालील हजारो हेक्टरवरील खरीप पिके वाया जाण्याची स्थिती आहे.
यामुळे एकीकडे तलाव व धरणांचे पुनर्भरण, त्यामुळे पिके जणू सरणावर जात आहेत. मन्याड धरणाच्या ओव्हरफ्लोमधून गिरणा नदीत वाया जाणारे पाणी मागील दहा-पंधरा दिवसांपासून जामदा डाव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. यातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलाव व भोकरबारी धरण भरण्यात येत आहेत. गिरणेवरील जामदा बंधारा येथून जामदा डावा कालवा निघातो. चाळीसगाव व भडगाव तालुक्यात जवळजवळ ५०-७० मैलांपर्यंत कालव्याची लांबी आहे. लाखो हेक्टर शेतजमीन कालव्याखाली येते.
कालव्यापासून अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत कालवा वितरिका(चाऱ्या) यातून कालव्याचे पाणी पाझरते. जामदा कालवा या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत पाझरतो. हे पाणी उतारावरील शेतजमिनीत वाहते. यामुळे सततच्या पाण्याने पिकांची मुळे पोखरून निघत आहेत. अतिपाण्याने मुळे कुजत, सडत आहेत.
कायमची डोकेदुखी
दरवर्षी पावसाळ्यात गिरणा किंवा मन्याड धरण भरल्यानंतर गिरणा नदीत वाया जाणारे पाणी या जामदा कालव्यात टाकले जाते. तेथून म्हसवे तलाव व भोकरबारी भरण्यात येते. पंधरा दिवस ते महिनाभर हे पुनर्भरण चालते. शिंदी येथील शेतकरी रमेश केशव पाटील यांनी लोकमतला आपली व्यथा मांडतांना सांगितले की, कालव्याखालील विहिरी या पाझरामुळे तुडुंब भरल्या आहेत. त्यावरून ओसंडत उभ्या कपाशीत पाणी पंधरा दिवसांपासून वाहत आहे. यामुळे संपूर्ण उत्पन्न बुडाले आहे. देवबानं झाय्
थोड्ं..पाटबंधारांनी. धाड् घोडं..! पावसाचे पाणी कमी झाले की काय? पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पाणी फिरवले. असे गाऱ्हाणे मांडले.
या कालव्याखाली जामदा, भऊर, बहाळ, गुढे, कोळगाव, शिंदी, खेडगाव ,शिवणी, वडगाव-नालबंदी, वलवाडी ते थेट आमडदेपर्यंतच्या शिवारातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.
फोटो कॅप्शनः पारोळा तालुक्यातील म्हसवे तलाव, भोकरबारी धरणात जामदा डावा कालव्यातून सोडलेले पाणी. कालव्याच्या पाझराने तुंडुंब भरलेल्या विहिरी व कपाशीत साचून राहिलेले पाणी