लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात १८ गावांतील १८० घरांची पत्रे उडून गेली आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले. सामरोदसह परिसराचा संपर्क तुटला आहे, तसेच एक तरुण बंधाऱ्यात वाहून गेला. या घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने या गावांना मदत करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.
पालकमंत्र्यांनी जामनेरच्या तहसीलदार दीप शेवाळे यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे निर्देश दिले, तसेच अतिवृष्टीग्रस्त भागासाठी कोरोनाच्या अतिरिक्त १७ हजार लसी देण्यात आल्या, तसेच औषध फवारणीची तरतूद करण्याचे निर्देश दिले. सोमवारी रात्री उशिरा जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. याची माहिती मिळाल्यावर तातडीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जामनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून मदतीचे निर्देश दिले. गरज भासल्यास एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याच्या सूचनाही दिल्या. महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. त्यात जामनेर तालुक्यात १७ गावांमध्ये हानी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यात हिंगणे येथे २० घरांचे, ओखर आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी ४० घरांचे पत्रे उडाले आहेत. रामपूर येथे १०, लहासर येथे १५ घरांचे पत्रे उडाले आहेत. ढालशिंगी येथे चार घरांची पडझड झाली आहे. त्यासोबत तळेगाव आणि पहूर येथे दुकानांमध्ये पाणी शिरले आहे, तर तोंडापूर येथील खडकी नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यात शेख मुसा शेख साहीर (वय ३०) हा पाण्यात वाहून गेला. अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये शाळा, मंदिरे आणि खासगी गोदामांमध्ये ग्रामस्थांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणी ओसरल्यावर नागरिकांनी रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.