पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळ्यातील हुडको रस्त्यावर कुंभारवाड्यात वैभव बैरागी याच्या घरात कुंटणखाना चालत असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली होती. त्यानुसार बडगुजर यांनी मंगळवारी रात्री महिला पोलीस व इतर सहकाऱ्यांना घेऊन सापळा रचून धाड टाकली असता घरात ग्राहक, दलाल व तीन महिला मिळून आले. रोख रक्कम व कंडोम आदी वस्तूदेखील मिळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान, याआधीदेखील पिंप्राळा व या भागाला लागून असलेल्या एका घरातील कुंटणखाना पोलिसांनी उधळून लावला होता.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटेच्या सुमारास घर मालक वैभव देवीदास बैरागी (वय २५), दलाल जयेश रमेश अग्रवाल (वय २७, रा. चोपडा) व एक महिला अशा तिघांविरुद्ध पीटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वैभव व जयेश या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ताब्यात घेतलेल्या तीन महिलांना शासकीय आशादीप महिला वसतिगृहात पाठविण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.