जळगाव : तालुक्यातील पाथरी येथे दूध उत्पादक सहकारी संस्थेची डेअरी कोणीतरी मंगळवारी रात्री दरवाज्याचा कोयंडा तोडून जाळल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी गुरुवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दूध संकलन करून डेअरी सचिव शशिकांत बाविस्कर व कर्मचारी गणेश मिस्तरी यांनी बंद केली होती. बुधवारी पहाटे ४ वाजता डेअरीच्या इमारतीतून धुराचे लोट निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती शेजाऱ्यांनी शशिकांत बाविस्कर यांना दिली. डेअरीचे कुलुपाचा कोयंडा तोडून डेअरीत घुसून इनव्हटर्रची बॅटरी, प्रिंटर, ॲनालायझर व स्टार्टर मशीन, स्टेशनरी पेटवून दिलेली होती. या आगीत दोन वर्षाचे रेकॉर्ड जळून खाक झाले. आगीत ५१ हजार रुपयांचे नुकसान केले आहे. पोलीस पाटील संजीव लंगरे यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळाची पोकॉ. हेमंत पाटील, स्वप्नील पाटील यांनी पाहणी केली. एम.आय.डी.सी. पोलिसात घटनेबाबत दूध उत्पादक सोसायटीचे सचिव शशिकांत शिवाजी बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराम सपकाळे करीत आहेत.