लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बोर्डावर १३०० चा भाव असतानादेखील फक्त ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात असल्याचे वृत्त लोकमतने ३० ऑगस्ट रोजी दिले होते. या प्रकरणात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ३५ केळी व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सभापती कैलास चौधरी यांनी ही नोटीस बजावली आहे.
या नोटिशीत म्हटले की, केळी हा नियंत्रित शेतीमाल आहे. मात्र त्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून ७०० रुपये प्रति क्विंटल दराने केळी विकत घेतली जात आहे. बोर्डावर भाव मात्र १३०० रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. त्यामुळे बाजार कायद्यानुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याचा लेखी खुलासा आणि १ एप्रिल ते ३१ ऑगस्टअखेर खरेदी विक्रीचे रेकॉर्ड तीन दिवसांचे आत बाजार समितीकडे सादर करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती कैलास चौधरी यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा तब्बल ५०० रुपये प्रतिक्विंटलने दर कमी मिळत असल्याचे समोर आले होते. एकीकडे बाजारात केळी चढ्या दराने विकली जात आहे. तर व्यापारी मुद्दाम बाजारात उठाव नसल्याचे कारण देत कमी दराने विकत घेत होते. शेतकऱ्यांवरील या अन्यायाला लोकमतने वाचा फोडली आहे.