जळगाव : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठविल्याने पोलीस दलातही आता बदल्यांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. शासन नियमाप्रमाणे यंदा १५ टक्के बदल्या होणार असून, त्या आकडेवारीनुसार जिल्हा पोलीस दलात ४८२ कर्मचारी बदलीपात्र आहेत. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्जावरून ३० टक्के पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेतच बदली हवी आहे. त्यासाठी अनेकांनी मंत्री, आमदार, खासदार व ओळखीच्या अधिकाऱ्यांमार्फत फिल्डिंग लावली असून, काही जणांना स्थगिती हवी आहे.
त्याशिवाय पाचोरा, चाळीसगाव, जळगाव एमआयडीसी, भुसावळ बाजारपेठ, अमळनेर, आदी ठिकाणीदेखील अनेकांची मागणी आहे. खंडित, अखंडित सेवेत ज्यांना एका उपविभागात बारा वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांनीही यंदा स्थगिती मागितली आहे. गेल्या वर्षी तसेच दोन वर्षांपासून स्थगिती मागणाऱ्यांनीदेखील यंदा स्थगिती मागितली आहे. दरम्यान, शासन नियमानुसार १५ टक्के याप्रमाणे ४८२ कर्मचारी बदलीपात्र आहेत. परंतु, ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, अशा कर्मचाऱ्यांची संख्या ६५२ इतकी होत असल्याची माहिती आस्थापना प्रमुख दीपक जाधव यांनी दिली. टक्केवारीनुसारचा आकडा व बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा आकडा यात पोलीस अधीक्षक कसा मेळ घालतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून आहे. खंडित-अखंडित संवर्गातील कर्मचाऱ्यांना स्थगिती मिळण्याचीच अधिक शक्यता वर्तविली जात आहे.
काय आहे नवा शासन आदेश
कोविड-१९ चे कारण व तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सरकारी विभागातील बदल्यांना ३० जूनपर्यंत देण्यात आलेली स्थगिती शासनाने उठविली असून, मर्यादित स्वरुपात १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. मात्र, सर्वसाधारण बदल्या या ३१ जुलैच्या आतच कराव्या लागणार आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी झालेला असला तरी पोलीस दलासाठी अद्याप महासंचालकांचा आदेश झालेला नाही. येत्या काही दिवसात पोलिसांसाठी स्वतंत्र आदेश निर्गमित होतील किंवा सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाचाच आधार घेऊन बदल्या होऊ शकतात.
कोणत्या उपविभागातून किती?
जळगाव उपविभाग-११५
भुसावळ उपविभाग-६५
मुक्ताईनगर उपविभाग-४१
फैजपूर उपविभाग-३१
चाळीसगाव उपविभाग-८३
पाचोरा उपविभाग-५४
अमळनेर उपविभाग-५२
चोपडा उपविभाग-४२
पोलीस मुख्यालय -८६
जिल्हा विशेष शाखा-११
स्थानिक गुन्हे शाखा-१८
शहर वाहतूक शाखा-१२
उपविभागीय कार्यालय व इतर शाखा-४२
या पोलीस ठाण्यांना पसंती
स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असून, प्रभावी शाखा म्हणून याकडे पाहिले जाते. ही शाखा थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणात असते. या शाखेकडे जाण्याचे दोन उद्देश असतात. प्रभावी कामगिरी करायला या शाखेत वाव आहे, दुसरे अर्थकारणाशी संबंधित अनेक प्रकरणे या शाखेकडे असतात. चाळीसगाव व पाचोरा या दोन पोलीस ठाण्यांची हद्द मोठी आहे. क्रीम पोलीस ठाणे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.
मुक्ताईनगर, जामनेर नको रे बाबा !
मुक्ताईनगर, जामनेर व पहूर पोलीस ठाण्याला अनेकजण नाक मुरडतात. या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याने काम करताना रोषाला सामोरे जावे लागते. प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या दोन पोलीस ठाण्यांमध्ये एकतर्फीच काम करणे या ठिकाणी नाइलाजाने भाग पडते. या भागात तसं आलबेल चित्र आहे. मात्र, तरी देखील बदलीला या ठिकाणी अनेकांची नकारघंटा असते.