भोंगळ कारभार : वाहनधारकाची टोलनाका प्रशासनाकडे तक्रार
सचिन देव
जळगाव : गेल्या आठवड्यापासून नशिराबादला टोलनाका सुरू झाल्यानंतर, चारचाकी वाहनधारकांना आता भुसावळला जायचे म्हटल्यास टोल भरल्यावरच पुढे जाता येणार आहे. मात्र, जळगावातील एका नागरिकाचे चारचाकी वाहन बुधवारी नशिराबाद टोलनाक्यावर गेले नसतानाही, त्यांच्या ''फास्टॅग''मधून जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या प्रवासाचा टोल कट झाला आहे. वाहन टोलनाक्यावर गेले नसतानाही अशा प्रकारे टोलचे पैसे कापले गेल्यामुळे संबंधित वाहनधारकाला चांगलाच धक्का बसला आहे. त्यांनी या प्रकाराबाबत टोलनाका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
जळगावातील रहिवासी नंदकिशोर चोपडे यांनी आपल्या मालकीची चारचाकी कार जळगाव महावितरण कार्यालयात भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी दिली आहे. विशेष म्हणजे नंदकिशोर चोपडे हे स्वतः त्या कारवर चालक म्हणूनही काम करीत आहेत. २१ सप्टेंबर रोजी चोपडे हे जळगावातील महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना जळगावहून सकाळी कारने भुसावळला घेऊन गेले होते. यावेळी भुसावळला जाताना चोपडे यांनी ''फास्टॅग'' या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ८५ रुपये टोल भरला. त्यानंतर सायंकाळी भुसावळहून जळगावकडे येताना पुन्हा या टोलनाक्यावर ४५ रुपये टोल भरला आणि जळगावात आले. त्यानंतर चोपडे यांनी दुसऱ्या दिवशी कुठेही न जाता ही कार महावितरणच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात पार्किंग केली होती.
इन्फो :
अन् वाहन टोलनाक्यावर गेले नसतानाही पैसे कट
नंदकुमार चोपडे हे २१ रोजीच भुसावळहून सायंकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेऊन परतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ सप्टेंबर रोजी ही कार महावितरणच्या कार्यालयात पार्किंग केली. मात्र, यावेळी त्यांचे वाहन राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्यावर गेले नसतानाही त्यांच्या ''फास्टॅग'' सिस्टीममधून जळगाव ते भुसावळच्या प्रवासाचे ८५ रुपये टोलचे पैसे कट झाल्याचा मेसेज आला आहे. टोलनाक्यावर वाहन गेले नसतानाही, टोलचे पैसे कापले गेल्यामुळे त्यांनी टोलनाका प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबद्दल ''लोकमत''शी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इन्फो :
''फास्टॅग''च्या माध्यमातून पैसे कापले जाणाऱ्या सिस्टीममध्ये सध्या तांत्रिक समस्या येत आहेत. त्यामुळे संबंधित वाहनधारकाच्या ''फास्टॅग''च्या सिस्टीममधून टोलनाक्यावर वाहन आले नसतानाही पैसे कापले गेले आहेत. मात्र, दोन दिवसांत कापले गेलेले पैसे पुन्हा त्यांच्या ''फास्टॅग'' अकाउंटला जमा होतील.
-शिवदत्त शर्मा, व्यवस्थापक, नशिराबाद टोलनाका.
इन्फो :
नियमानुसार २० किलोमीटरच्या आत ४५ रुपये टोल आकारला पाहिजे. मात्र, त्यांनी ८५ रुपये टोल आकारला. त्यात बुधवारी माझी गाडी या टोलनाक्यावर वा महामार्गावर कुठेही गेली नसताना ''फास्टॅग'' सिस्टीममधून ८५ रुपये कापले गेल्याचा मेसेज आल्यानंतर काहीसा धक्काच बसला. त्यामुळे या प्रकाराबाबत टोलनाका प्रशासनाकडे तक्रार केली असून, असा प्रकार इतर वाहनधारकांच्या बाबतीत घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.
- नंदकिशोर चोपडे, वाहनधारक