चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र हे कपाशी लागवडीचे ठरले, तर त्याखालोखाल मका लागवड झाली. रब्बी हंगामात मका पिकाचे बऱ्यापैकी उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. बाजार भावही चांगला मिळाला. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटल्याने जवळजवळ मक्यानेच शेतकऱ्यांना तारले. खरिपातील बळीराजाचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे.
बागायती व कोरडवाहू दोन्ही मिळून ५७ हजार ५० हेक्टर क्षेत्रावर चाळीसगाव तालुक्यात कपाशीची लागवड झाली आहे. त्याखालोखाल ११ हजार २७९ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी खरीप हंगामाचे पूर्ण तीनतेरा झाले. कारण मान्सूनने कुठे रोहिणी नक्षत्रात हजेरी लावली, कुठे मृग नक्षत्रात हजेरी लावली तर कुठे आर्द्रा नक्षत्रात हजेरी लावली.
प्रत्येक नक्षत्रात १४-१५ दिवसांचा फरक पडल्याने जसजसा पाऊस पडला तसतशा शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यामुळे पिकांची स्थिती एकसंघ न राहता मागे पुढे झाली. बऱ्याचठिकाणी तर कोरडवाहू क्षेत्रावर दुबार, तिबार पेरणी करावी लागली. दरवर्षी जूनच्या पहिल्या पंधरा दिवसांत कपाशी लागवड उरकली जायची. मग ती बागायती असो की कोरडवाहू यावर्षी बागायती कपाशी वगळता कोरडवाहू कपाशी लागवड जूनच्या शेवटच्या हप्ता व जुलैच्या पहिल्या हप्तापर्यंत रेटावी लागली. त्यामुळे जिल्ह्यात ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
यावर्षी रोगराईचे प्रमाण कमी
पिकांची लागवड जरी यावर्षी एकसारखी झाली नसली तरी महत्त्वाचे म्हणजे कपाशी व मका या पिकांवर रोगराईचे प्रमाण अगदी कमी दिसून येत आहे. दीड, दोन महिन्यांचे कपाशीचे पीक झाले. बऱ्याच शेतकऱ्यांनी एक किंवा दोन कीटकनाशकांची फवारणी केली. तीही कमी खर्चात. मका पिकावरदेखील लष्करी अळीचे प्रमाण कमी असल्याने यावर्षी अळींचा हल्ला प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येत आहे. आजमितीला दोन्ही पिके जोमदार दिसत आहेत जास्त करून कपाशीचे पीक जोमात दिसत आहे.
विहिरी, नदी, नाले धरणाची स्थिती नाजूक
पावसाळा सुरू होऊन दीड महिना होत आला तरी मन्याड परिसरातील विहिरी, नदी, नाले यांनी तळ गाठला असून, मन्याड धरणात ही उपयुक्त साठ्यात अजूनपर्यंत कुठलीही वाढ झाली नाही. गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणाने शतक पूर्ण करून ऑगस्ट क्रांती करून परिसरातील शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता. यावर्षी पीक परिस्थिती जरी चांगली असली तरी विहिरी, नदी, नाले व धरण भरण्यासाठी दमदार पावसाची वाट शेतकरी पाहत आहेत. याप्रमाणे गेल्या आठवड्यापर्यंत पीकपेरा झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यात सद्य स्थितीत पीकपेऱ्याचे क्षेत्र हेक्टरमध्ये.
अ. न. पिकाचे नाव क्षेत्र (हेक्टरमध्ये)
१) भात ०
२) ज्वारी ७१०
३) बाजरी २१२९
४) नाचणी ०
५) मका ११२७९
६) भुईमूग ३००
७) तूर ३७१
८) मूग ७४८
९) उडीद ६४३
१०) तीळ ५४
११) सूर्यफूल (०)
१२) सोयाबीन ५०
१३) कापूस ५७ हजार ०५०