जळगाव : ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो. गेल्या काही दिवसांपासून जळगाव आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येतात. त्याचा परिणाम अस्थमाचा त्रास होण्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ज्या रुग्णांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांनी त्याची आधीच काळजी घेणे, अपेक्षित आहे.
सध्याच्या काळात सूर्यप्रकाश कमी येतो. त्यामुळे रोगाला कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण देखील वाढते. या काळात सर्दी-खोकला वाढतो. अनेकांना आधीच दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्ये देखील बालदम्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे. त्यांनी त्याची काळजी घेणे गरजेचे असते.
तसेच दम्यामुळे प्रतिकारशक्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, दम्याच्या उपचारासाठी स्टेरॉईड्स घ्यावे लागतात. त्यामुळे अनेकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अन्य व्याधीही याच काळात जडतात.
बालकांनाही अस्थमा
बालकांना आधी सर्दी -खोकला होतो. मग दम लागतो, अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे, तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे, असे उपाय करावे लागत असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी दिली. तसेच गरजेच्या वेळी वैद्यकीय सल्ला आणि मदत अवश्य घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
ही घ्या काळजी
ज्यांना दमा आहे. त्यांनी आधीपासूनच थंड वातावरणात जाऊ नये, आपल्याला डॉक्टरांनी दिलेली औषधी कायम जवळ बाळगावी, तसेच ज्यांना पंप किंवा नेब्युलायजर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. तसेच संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
पावसाळी हवामानात काळजी घ्या
या काळात सूर्यप्रकाश कमी असल्याने अनेक संसर्ग वाढतात. ज्यांना दम्याचा त्रास आहे. अशांनी आपली औषधी आणि पंप कायम जवळ ठेवावेत. योग्य वेळी पंप न मिळाल्यास त्याचा परिणाम दम्याचा त्रास वाढण्यात होतो. - प्रा. डॉ. विजय गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय