जळगाव : एकिकडे कोविड कमी होत असताना नॉन कोविड रुग्णांचा मुद्दा गंभीर होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व्यवस्था असताना शिवाय कोविडचे रुग्ण कमी असतानाही गंभीर जखमी किंवा अन्य प्रकरणातील अत्यवस्थ रुग्णांना बाहेर पाठविण्याचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले आहे. या ठिकाणी रुग्ण आला म्हणजे काही वेळातच त्याला बाहेर घेऊन जावे लागेल, असे सांगून रुग्णांना बाहेर पाठविले जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या पंधरावर आल्यामुळे या ठिकाणी आता नॉन कोविड यंत्रणा पूर्ववत सुरू करावी, असा प्रस्तावच पाठविण्यात आला आहे. रुग्ण संख्या कमी असताना मनुष्यबळालाही चिंता नाही. मात्र, असे असतानाही नेत्र कक्ष विभागात असलेल्या आपत्कालीन कक्षात अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. मात्र, या ठिकाणी यंत्रणा असताना बेड असताना, मनुष्यबळ असतानाही रुग्णांना दाखल करणे मात्र, टाळले जात आहे. कोविडचे कारण देऊन डॉक्टरांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय हीच टोलवाटोलवी आता रुग्णांच्या जीवावर उठली आहे.
काय होतो परिणाम
जीएमसी ते डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचे अंतर हे २० किलोमीटर आहे. अशा स्थितीत प्राथमिक उपचारानंतरही आवश्यकता ती सुविधा जर याच आपत्कालीन कक्षात उपलब्ध करण्यात आली तर कदाचित अत्यवस्थ रुग्णाचा जीव वाचविला जाऊ शकतो, असे असतानाही या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यास चालढकल केली जात आहे.
दोन महिन्यांपूर्वीच गंभीर प्रसंग
दोन महिन्यांपूर्वी एका बालकाच्या कानाचा कुत्र्याने लचका तोडल्यानंतर या बालकालाही या ठिकाणी इंजेक्शन नसल्याचे सांगून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविले होते. त्यानंतर बालकांना याच ठिकाणी इंजेक्शन दिले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ रुग्णांना सुविधा असतानाही बाहेर पाठविण्यात येत आहे. यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या मोठ्या घटना
- महिलेच्या चेहऱ्यावर कुत्र्याने गंभीर चावा घेतल्यानंतर महिलेला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
- सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने जखमी प्रौढाचा मृत्यू
- सर्पदंश झालेल्या महिलेला सलाईनसाठीही दाखल करून घेतले जात नव्हते.
- फिनाईल पिलेल्या प्रौढाला प्राथमिक उपचारानंतर तातडीने या ठिकाणाहून न्या असे सांगण्यात आले.