जालना - जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोड ओळ पद्धतीने हरभरा लागवड करून घेतले. जोड ओळ पद्धतीने घेतल्यास हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उतारा जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हरभरा लागवड पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर करून जोड ओळ पद्धतीचा अवलंब वापरल्यास उत्पन्नात वाढ होते. हे प्रात्यक्षिक कृषी विभागाने केले. भोकरदन तालुक्यातील येथील जानेफळ दाभाडी येथील सोमनाथ मिसाळ यांनी टोकन पद्धतीने हरभरा लागवड केली आहे. गादीवाफ्याची (बेड) उंची दीड फूट तर रुंदी दोन फूट आहे. बेडवर ठिबकचे लॅटरल प्रत्येकी १२० सेमी अंथरण्यात आले. प्रत्येक लॅटरलच्या आजूबाजूला एकेक फूट अंतरावर तर एका ओळीत सहा इंच अंतर ठेवत टोकण पद्धतीने हरभरा लावला. नवीन पद्धतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. असा प्रयत्न जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत आत्मा, कृषी विभाग यांच्या मदतीने करण्यात येत आहे. हरभरा पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी, अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक्षम वाणांचा वापर, योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, बीजप्रक्रिया आणि जीवाणू संवर्धनाचा, वापर, तणनियंत्रण पाण्याचे योग्य नियोजन, रोग आणि किडींपासून पिकाचे संरक्षण, या बाबींचा वेळीच अवलंब केल्यास उत्पादनात नेहमीपेक्षा या प्रकारातून उताऱ्यात नक्कीच वाढ होणार असल्याचे बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
अळी बाल्यावस्थेत पिवळी, गुलाबी, काळे किंवा राखाडी रंगाची असून कोवळी पाने व फांद्यावर उपजीविका करते. दुसऱ्या अवस्थेत पाने, कळ्या, फुले खाते. तिसऱ्या अवस्थेत घाट्यांना छिद्र करून दाणे खाते. याला क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ३ ग्रॅम प्रति १० लीटरप्रमाणे फवारावे.
जोडओळ पद्धतीने लागवड केलेला हरभऱ्याचे पीक असे झाले आहे.