माहोरा : मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडी दराने खरेदी करीत असतील तर आता शेतकरी, शिवसैनिक रुमणे हातात घेतील, असा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक दादाराव सरोदे यांनी दिला.
मार्केट कमिटीत बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. जाफराबाद, माहोरा येथील बाजारपेठेत मिरचीला कवडीमोल दर देऊन व्यापारी खरेदी करीत होते. मिरचीला चांगला दर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत होते. परंतु, संबंधित जबाबदार व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मिरचीच्या दरावरून हाणामाऱ्या होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मिरचीला अपेक्षित दर मिळाला नाही तर शेतकरी आणि शिवसैनिक ही बाब सहन करणार नाहीत, असा इशाराही सरोदे यांनी दिला.
मिरची मार्केट खुले
माहोरा, जाफराबाद येथील मिरची मार्केटमध्ये चार-पाच दिवसांपासून असलेला तणाव कमी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांसह आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा करून मिरची मार्केट पुन्हा खुले करण्यात आले आहे.