जालना : विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील वाड्या, तांडे, वस्त्यांवरील जिल्हा परिषदेच्या १०९ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे.
मध्यंतरी इंग्रजी शाळांचे पेव फुटले आणि पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे वाढू लागला. खासगी इंग्रजी शाळांमध्ये वार्षिक हजारो रुपयांची फी भरून पालक मुलांना शिक्षण देत होते. त्यामुळे घटणाऱ्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनेही विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाल्याने अनेक पालकांनी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठविण्यास सुरुवात केली. अनेक उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती असोत किंवा क्रीडा स्पर्धा असोत, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आपली छाप सोडत आहेत.
कोरोनामुळे चालू वर्षात शाळा भरल्याच नाहीत, तर शिक्षण विभागाच्या अहवालानुसार गत शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील १०९ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी गावस्तरावरील शिक्षणप्रेमींची मदत घेतली जात आहे. शिवाय शिक्षकांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवाय ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तेथील शिक्षकांना गरजेनुसार इतर शाळांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे.
पटसंख्या वाढीसाठी पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक वाटपासह इतर उपक्रम राबविले जात आहेत. एकूणच कोरोनाची स्थिती आहे. शाळा पूर्ववत सुरू झाल्यानंतरही पालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन, गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांची शाळांमधील संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
तालुकानिहाय स्थिती
जिल्ह्यातील तब्बल १०९ शाळांची पटसंख्या २० हून कमी आहे. यामध्ये सर्वाधिक ३७ शाळांची पटसंख्या २० हून कमी आहे. त्यासोबत जालना तालुक्यातील ८, बदनापूर तालुक्यातील ९, अंबड तालुक्यातील ८, घनसावंगी तालुक्यातील १२, परतूर तालुक्यातील १, मंठा तालुक्यातील १५ व जाफराबाद तालुक्यातील १९ शाळांचा यामध्ये समावेश आहे.
शिक्षकांचे काय?
ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे आणि शिक्षक जास्त आहेत, अशा शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची इतर शाळांमध्ये बदली केली जाणार आहे. शिवाय शाळेत राहणारा शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासह इतर प्रशासकीय कामकाज पूर्ण करणार आहे.
विद्यार्थ्यांचे काय ?
जिल्ह्यातील जवळपास १०९ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० हून कमी आहे. या शाळा वाड्या, वस्त्या, तांड्यावरील आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी शालेय स्तरावरून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याकामी शिक्षणप्रेमींची मदत घेतली जाणार आहे.
पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रयत्न
जिल्ह्यातील ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, तेथील शिक्षकांची गरजेनुसार इतरत्र बदली केली जाणार आहे. शिवाय संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठीही शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी प्रा.
अशी आहे आकडेवारी
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या १५०४
प्रशासकीय कारणास्तव एकत्रित केलेल्या शाळा २०
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा १०९