जालना : आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेली जनजागृती आणि वेळोवेळी केले जाणारे सर्वेक्षण यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूच्या प्रादुर्भावाला चांगलाच ब्रेक बसला आहे. गत वर्षभरात जिल्ह्यात डेंग्यूचे १५ रुग्ण आढळले होते.
जालना जिल्ह्यात २०१८ ते २०१९ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. डेंग्यूमुळे या कालावधीत तीन जणांचा मृत्यूही झालेला आहे. डेंग्यूचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता जिल्हा हिवताप कार्यालय, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती, आराेग्य तपासणीची मोहीम राबविली आहे. यात आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, पाणी साठलेले भांडे योग्य पद्धतीने झाकून ठेवणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, घराभोवताली, छतांवर वापरात नसलेले साहित्य न ठेवणे, त्यात पाण्याचा अधिक काळ साठा होऊ न देणे आदी सूचना पथकांमार्फत देण्यात आल्या आहेत.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूची लक्षणे ही विषाणूजन्य गंभीर तापासारखी असतात.
अचानक येणारा ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी.
भूक मंदावणे, मळमळ होणे, पोट दुखणे आदी लक्षणे प्रारंभी दिसतात.
प्रारंभीची लक्षणे साध्या तापासारखी असतात. शिवाय त्वचेवर पुरळ दिसतात.
शिवाय आजार तीव्र झाल्यानंतर नाकातून, हिरड्यातून रक्तस्राव होतो.
शहर परिसरातील तेहेतीस हजार घरांचा सर्व्हे
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग नियंत्रणासाठी शहरी, ग्रामीण भागात पथके नियुक्त करण्यात आली आहेत. डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आला तरी संबंधित रुग्ण राहत असलेल्या परिसरामध्ये पथकामार्फत सर्वेक्षण केले जाते. गतवर्षी २०२० मध्ये जालना शहर व परिसरातील ३३ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शिवाय डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबतही शहर परिसरात नियुक्त करण्यात आलेल्या ७ पथकांमार्फत वेळोवेळी जनजागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले.
कुठल्या वर्षात किती पेशंट
२०१६- १७
२०१७- १०
२०१८- ११०
२०१९- ५६
२०२०- १५