जालना : दोन वर्षांपूर्वी जालन्यात तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेसाठी एका तक्रारदाराने थेट विभागीय आयुक्तांकडे या सर्व गोंधळाबाबत तक्रार केली होती. त्यात तक्रारीत तत्कालीन चार ते पाच तलाठी व अन्य कर्मचाऱ्यांनीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही रक्कम घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याची आता विभागीय आयुक्तांनी दोन सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरू केली आहे.
यासंदर्भात तक्रारदार मुज्जमिल अर्शद शेख यांनीही आयुक्तांकडे ५ ऑगस्टला केली होती. त्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की तलाठी पदासाठीच्या परीक्षेत मोठी अनागोंदी झाली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यास मोठा घोटाळा पुढे येऊ शकतो असे नमूद केले होते. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त पराग सुमान यांनी आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी नियुक्त समितीत उपायुक्त जगदीश मणियार आणि शिवाजी शिंदे यांचा समावेश आहे.
या समितीने चौकशी सुरू केली असून, यात जालना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले दाेन तलाठी आणि औरंगाबादेतील दोन तलाठी हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तक्रारदार मुज्जमिल शेख यांनी आयुक्तांना या सर्व संभाषणाची ऑडिओ क्लिप सादर केली आहे. त्यात या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
विनंतीवरूनच्या बदल्यांचा प्रस्ताव रद्द
जालना जिल्ह्यातील महसूल विभागातील विशेष कारणास्तव करण्यात आलेल्या विनंती बदल्या रद्द केल्या आहेत. यात महसूल सहायक आठ, अव्वल कारकून एक, मंडळ अधिकारी तीन, वाहन चालक एक यांच्या बदल्यांचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु, तो प्रस्ताव आयुक्तांनी अमान्य केला असल्याचे पत्र उपायुक्त महसूल पराग सोमण यांनी पाठविले आहे. .