जालना : कोरोना संक्रमण रोखण्यास महत्त्वाची ठरणारी कोविशिल्ड लस बुधवारी जालना येथील जिल्हा लस भांडारात दाखल झाली आहे. १४ हजार २२० डोस क्षमता असलेले १४२२ ‘वाइल’ लसीकरण वाहनातून आणण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मकर संक्रांतीनंतर १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १२ हजार ५०० जणांना लसीकरणरूपी ‘वाण’ देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. विशेषत: हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची मोठी उपासमार झाली. कोरोनाने आजवर जिल्ह्यात ३५५ जणांचा बळीही घेतला आहे. रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचा संसर्ग सुरूच होता. त्यामुळे कोरोनाची लस वेळेत यावी, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले होते. कोरोना लसीकरणाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. दोन वेळेस लसीकरणाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. लसीकरणासाठी केलेली तयारी आणि नियुक्त केलेल्या आठ केंद्रांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली होती. शासनस्तरावरून जिल्ह्यातील सहा लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेली कोविशिल्ड लस बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा लस भांडारात दाखल झाली. विशेष लसीकरण वाहनातून कोविशिल्डच्या १४२२ वाइल आणण्यात आल्या आहेत. याद्वारे १४ हजार २२० जणांना डोस देता येणार आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संतोष कडले, मुख्य औषध निर्माण अधिकारी आर. एस. कड, डॉ. नागदरवाड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत सोनखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप घुगे, चालक सिद्धिविनायक मापारी, रमेश राऊत, बाबासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.
या सहा केंद्रांची निवड
जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी प्रारंभी आठ केंद्रे नियुक्त केली होती. मात्र, शासनस्तरावरून सहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. यात जिल्हा रुग्णालय, अंबड उपजिल्हा रुग्णालय, भोकरदन, परतूर ग्रामीण रुग्णालयासह सेलगाव व खासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस दिली जाणार आहे.
एका वाइलमध्ये दहा जणांना डोस
कोरोना लसीची एक वाइल ५ एमएलची असून, एका व्यक्तीला ०.५ एमएलचा डोस दिला जाणार आहे. एका वाइलमध्ये दहा जणांना डोस देता येणार आहे. जिल्हा लस भांडारामध्ये आलेल्या १४२२ वाइलमधून १४ हजार २२० डोस होणार आहेत.
सुरक्षेसाठी पोलिसांना पत्र
जिल्हा रुग्णालय परिसरातील जिल्हा लस भांडारामध्ये कोविशिल्ड लस दाखल झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, यासाठी पोलीस दलाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सीसीटीव्हीची नजर असलेल्या या जिल्हा लस भांडारामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारीही येथे २४ तास तैनात करण्यात आले आहेत.
एका महिन्याच्या अंतराने दुसरी लस
एखादी व्यक्ती उजव्या हाताने काम करीत असेल तर तिच्या डाव्या हाताच्या दंडावर लस दिली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती डाव्या हाताने काम करीत असेल तर तिच्या उजव्या हातावर लस दिली जाणार आहे. विशेषत: लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या अंतराने संबंधिताला दुसरी लस दिली जाणार आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष
कोरोना लसीकरणासाठी एईएफआय समिती गठित करण्यासह एक जिल्हा नियंत्रण कक्षही नियुक्त केला जाणार आहे. जेणेकरून नागरिकांना, अधिकारी, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी या कक्षातून सोडविल्या जाणार आहेत.
शासकीय सूचनेनुसार प्रक्रिया
कोरोनाची लस जिल्ह्यात दाखल झाली आहे. शासनाने १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. लसीकरणाबाबत शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसारच पुढील सर्व प्रक्रिया राबविली जाईल.
डॉ. विवेक खतगावकर
जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना