जालना : शासकीय नोकरीसाठी बंजारा जातीचे बनावट कागदपत्र सादर करून बोगस जात प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल हिंमत मोरे, किशोर वेंकट भिडे, अमित अशिष मेडकर, बाबुलाल मोफतलाल मोरे (सर्व रा. जालना) व महेश गुलाबराव राऊत (रा. कुंभेफळ, ता. जालना), अशोक सुभाष गायकवाड (रा. रेवगाव, ता. जालना) अशी संशयितांची नावे आहेत. ( Crime against 6 people for making bogus certificates for government jobs)
विशाल मोरे, किशोर भिडे, अमित मेडकर, बाबुलाल मोरे यांनी शासकीय नोकरीसाठी खोटे कागदपत्र सादर करून भटक्या विमुक्त प्रवर्गातील बंजारा जातीचे जातप्रमाणपत्र काढल्याची तक्रार जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून सदरील प्रकरणाची चौकशी केली असता, ५ जुलै २०२१ रोजी महेश राऊत, अशोक गायकवाड यांच्याशी संगमनत करून खोट्या कागदपत्राच्या आधारे बंजारा जातीचे जातप्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय जालना यांच्याकडे अर्ज सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा - व्हाईट कॉलर गुन्हेगारी ! दर्गाहची शंभर एकर जमीन बळकवणाऱ्या सहा उच्चशिक्षितांवर गुन्हा
त्यानंतर नायब तहसीलदार तुषार बाळासाहेब निकम यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री संशयित विशाल हिंमत मोरे, किशोर वेंकट भिडे, अमित आशिष मेडकर, बाबुलाल मोफतलाल मोरे (सर्व रा. जालना) व महेश गुलाबराव राऊत (रा. कुंभेफळ, ता. जालना), अशोक सुभाष गायकवाड (रा. रेवगाव, ता. जालना) यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे सपोनि. टाक यांनी दिली आहे. अद्याप आरोपी फरार असून, त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असेही ते म्हणाले.