जिल्ह्याची स्थिती : कोरोनातील सूचनांचे पालन करून विल्हेवाट
जालना : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून कोरोनातील नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८१ टन जैविक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. कोरोनापूर्वी वार्षिक सरासरी २० ते २४ टन कचऱ्याचे संकलन होत होते. मात्र, कोरोनातील नऊ महिन्यांच्या कालावधीतच ८१ टन म्हणजे तीन-साडेतीन वर्षाचा कचरा संकलित झाला आहे.
शासकीय रुग्णालये असो अथवा खासगी रुग्णालये, या रुग्णालयातील कचरा घनकचऱ्याप्रमाणे कोठेही टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: कोरोनाच्या कालावधीतील संक्रमण पाहता या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागावी याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कचऱ्याचे संकलन करण्यासाठी नियुक्त केलेल्या सहा वाहनांद्वारे कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी दोन टन कचरा संकलित झाला होता. नंतर मात्र, जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरासरी १० ते ११ टन कचऱ्याचे संकलन झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनापूर्वी मासिक दोन टन आणि वार्षिक सरासरी २० ते २४ टन कचऱ्याचे संकलन होत होते.
जैविक कचरा फेकणाऱ्यांना दंड जैविक कचरा कोठेही टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा देऊन सुनावणी घेतली जाते. सुनावणीनंतरही कोणी कचरा विल्हेवाट नियमांचे उल्लंघन केले तर त्या आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाते. कोरोनाकाळात अशी एकही कारवाई झालेली नाही.
साडेतीन वर्षांचा कचरा
नऊ महिन्यात संकलित
यापूर्वी जिल्ह्यात वार्षिक केवळ २० ते २४ टन जैविक कचरा संकलित होत होता. मात्र, कोरोनामुळे सलाइन, इंजेक्शन, कीट यासह इतर साहित्याचा, साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे कोरोनातील नऊ महिन्यांच्या काळातच तीन ते साडेतीन वर्षात संकलित होण्याइतका कचरा संकलित झाला आहे.
शासकीय, खासगी रुग्णालयांमधील कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या कालावधीत सर्वच रुग्णालयांनी या सूचनांचे पालन केले आहे.
- डॉ. विवेक खतगावकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी