सध्या एकीकडे नागरिकांकडे पैसे नसल्याचे बोलले जात आहे; परंतु बँकिंग क्षेत्राचा विचार केल्यास आश्चर्यकारक स्थिती समोर आली आहे. एकट्या जालन्याचा विचार केल्यास शहर व जिल्ह्यात जवळपास ६० पेक्षा अधिक सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँका आणि त्यांच्या जवळपास ३०० पेक्षा अधिक शाखा आहेत. या सर्व बँका पूर्वी आपल्या बँकेचे डिपॉझिट अर्थात ठेवी वाढवाव्यात म्हणून व्यापारी, उद्योजक, नोकरदार वर्गांकडे चकरा मारत असत. तसेच ठेवींचे आकर्षक व्याजदर आमचे इतरांच्या तुलनेने कसे जास्त आहे, हे पटवून देऊन ठेवी स्वीकारत असत.
आज याच्या नेमकी उलट स्थिती निर्माण झाली आहे. आज अनेकजण बँकांमध्ये आपल्या ठेवी ठेवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत; परंतु बँकांकडून त्यांना पूर्वीएवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. आज ही परस्थिती नेमकी कशी बदलली याबद्दल येथील बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ तथा प्रियदर्शनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सचिन वाणी यांना विचारले असता ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत अनेक नागरिक त्यांच्या परिश्रमातून कमावलेली रक्कम ही सुरक्षित राहून, ती म्हातारपणी कामी यावी यासाठी बँकेत लॉकर घेऊन अथवा बँकेत बचत खाते किंवा ठेवी ठेवत असत. ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच बँकांकडे आता त्यांनी ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे डिपॉझिट झाले आहे. त्यामुळे या सर्व रकमेचे करायचे काय, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे.
यावर उपाय म्हणून बँका कर्ज वाटपाला प्राधान्य देत आहेत. पूर्वी कर्ज मिळण्यासाठी बँकांचे उंबरठे झिझवावे लागत असत; परंतु आता बँका कर्ज घेणाऱ्यांच्या मागे लागत असल्याचे चित्र आहे. कर्ज देताना संबंधित व्यक्तीची बँकेतील व्यवहाराबद्दलची पत तपासण्यासाठी सिबिल ही नवीन संकल्पना रुजली आहे. कर्जदाराने घेतलेले कर्ज तो सुलभ पद्धतीने आणि नियमितपणे फेडतो की नाही, यावर त्याची पत ठरते. यासाठी ३०० ते ९०० पर्यंतचे मानांकन दिले जाते. जे कर्जदार ६०० पेक्षा अधिक मानांकन मिळवितात, त्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी खुद्द बँकेकडून विचारणा होते. तर जे नियमितपणे कर्जफेड करत नाहीत, त्यांना दुसऱ्यांदा कर्ज देताना बँक खूप गंभीर असते.
चौकट
ज्येष्ठ नागरिकांना व्याजदराचा फटका
पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना ठेवी ठेवल्यास जास्त व्याजदर दिला जात होता; परंतु आता एकूणच ठेवींवरील व्याजदर कमी झाल्याने याचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. या ठेवीच्या व्याजदरात ते त्यांना लागणारी औषधी तसेच अन्य गरजा भागवत होते; परंतु त्यातून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे.
सामान्यांची क्रयशक्ती घटल्याचा परिणाम
आज बेरोजगारीने कळस गाठला आहे. त्यामुळे बाजारातील उलाढाल मंदावली आहे. सामान्य माणसाकडे आपला उदरनिर्वाह भागविण्याएवढाही पैसा नाही. हा पैसा काही मूठभर लोकांच्या हातात एकवटला आहे. त्यामुळे श्रीमंतांना उपभोग्य वस्तूंसाठी पैसा खर्च करावा लागत नाही. ते पैसा केवळ एक चैनीची वस्तू म्हणून मानतात. त्यामुळे मूठभर लोकांचा पैसा बँकेत असून, त्यांना कर्ज काढण्याची गरज पडत नाही.
डॉ. मारोती तेगमपुरे, अर्थतज्ज्ञ