भोकरदन : खुल्या बाजारपेठेत कापसाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सीसीआयऐवजी खाजगी बाजारपेठेत कापसाची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील सीसीआय केंद्रे ओस पडल्याचे दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कापसावर प्रक्रिया करणारे पाच जिनिंग प्रेसिंग युनिट आहेत. गत पंधरा दिवसअगोदर खुल्या बाजारपेठेत कापसाला ४५०० ते ५००० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता, तर सीसीआयचा भाव ५ हजार ७२५ रुपये होता. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांची गर्दी झाली होती. पाच दिवस कापूस मोजला जात नव्हता. मात्र, गत आठ-दहा दिवसांत बाजारपेठेत कापसाचे भाव वधारले आहेत. सध्या व्यापारी जागेवरून ५८०० ते ५९०० रुपये भावाने कापूस खरेदी करीत आहेत. जिनिंगवर चांगल्या प्रतीच्या कापसाला सहा हजारपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे. इतकेच नाही, तर नोंदणी करून सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर उभी असलेली वाहने व्यापारी व शेतकऱ्यांनी खाजगी बाजारपेठेत नेली आहेत. त्यामुळे सीसीआयच्या पाचही केंद्रांवर एकही वाहन उभे नसल्याने सर्व खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.
९९ कोटींच्या कापसाची खरेदी
भोकरदन येथील चार व राजूर येथील एक अशा पाच जिनिंगवर सीसीआयच्या माध्यमातून एक लाख ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्याची किंमत ९९ कोटी रुपये आहे. कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली होती.
कौतिकराव जगताप
सभापती, कृउबा, भोकरदन
बँकेत पैसे जमा
बाजारपेठेत कापसाला दर कमी असल्याने सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी गर्दी झाली होती. ज्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे त्यांचे पैसे संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
एस. धारेअप्पा
सीसीआय केंद्रप्रमुख, भोकरदन