अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल
जालना : शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस शहरातील एका संशयित युवकाने पळवून नेले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि झलवार करीत आहेत.
घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
जालना : शहरातील रामनगर ख्रिस्ती कॅम्प भागात राहणारे सुमीत जगधने हे शुक्रवारी रात्री घरी होते. त्यावेळी जाफर नामक व्यक्तीसह इतर तिघांनी घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच शेजारील रिक्षाचे नुकसान केल्याची तक्रार जगधने यांनी सदरबाजार ठाण्यात दिली. या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
जालना : शहरातील वाल्मीकनगर भागात राहणारे शेख सद्दाम शेख तमीस हे शुक्रवारी रात्री ख्रिस्ती कॅम्प भागातील एका दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या विनोद पाखरे व इतर एकाने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार शेख यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनुसार वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपिन वाघ करीत आहेत.
चौघींना मारहाण; बारा जणांविरुद्ध गुन्हा
जालना : शहरातील खडकपुरा भागात राहणाऱ्या हसीनाबानो अब्दुल करीम चौधरी या शनिवारी दुपारी घरी होत्या. त्यावेळी त्यांच्या घरी आलेल्या १२ जणांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच सोडविण्यास आलेल्या घरातील इतर तीन सदस्यांनाही मारहाण केल्याची तक्रार चौधरी यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.