जालना : कोरोना प्रादुर्भावात बाधितांची सेवा करणाऱ्या १०५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सेवासमाप्तीमुळे कामावरून कमी केले होते. बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले असून, उपोषणकर्त्यांच्या निवेदनानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन आणि शासनाच्या पत्रव्यवहार प्रक्रियेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले उपोषण आठवडाभरासाठी स्थगित केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि जनजीवन ठप्प झाले. बाधितांपासून आप्तेष्टही दूर गेले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड रुग्णालयासाठी १०५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती; परंतु कंत्राट संपल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात अचानक कामावरून कमी केल्याने संबंधितांवर उपासमारीची वेळ येणार आहे. ही बाब पाहता संबंधित कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रिक्त पदांवर कंत्राटी स्वरूपात नियुक्ती द्यावी, अशी मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणी, निवेदनानुसार योग्य ती कार्यवाही करावी, तसेच कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मागण्यांनुसार पत्रव्यवहार सुरू केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलनाला काही काळासाठी स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले.
...तर आंदोलन करू
कोरोनाच्या काळात आम्ही बाधितांची सेवा करून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले आहे. कोरोनाचे रुग्ण सध्याही आढळून येत आहेत; परंतु आम्हाला कामावरून कमी केल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केले असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा शरद चव्हाण, अॅलेक जेकब, सतीश भुट्टे, मारिया कांबळे, सौरभ तांबे आदींनी दिला आहे.