जालना : तब्बल वर्षभरानंतर पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्याने हातावर पोट असणारे कामगार आणि नोकदार वर्ग भयभीत झाला आहे. दरम्यान, हद्दपारीच्या उंबरठ्यावर असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन जाहीर झाले होते. त्याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील उद्योग, व्यापारावर झाला होता. या लाॅकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडणे शक्य नसल्याने रोजगारावर पाणी फेरावे लागले. त्यामुळे अनेकांचा उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला होता. शहर सोडून हजारो कामगार आपआपल्या गावी गेले होते. त्यामुळे उद्योजकदेखील हवालदिल झाले होते. हीच परिस्थिती नव्याने निर्माण झाल्यास ती कामगार आणि उद्योजकांनाही परवडणारी नाही. त्यामुळे शक्य तेवढी काळजी घेऊन कोरोनाला दूर ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. गेल्या २० दिवसांचा विचार केल्यास जिल्हाभरात ८०० कोरोना बाधित रूग्णांची वाढ होऊन १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक पुन्हा एकदा बेरोजगारीच्या संकटात होरपळण्याची शक्यता आहे.
धोका वाढतोय
गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. ही रूग्णसंख्या वाढीमागे वातावरणातील बदलही कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून कधी कडक ऊन तर अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने वातावरणात लक्षणीयरित्या बदल झाला आहे.
जालन्यातील स्टील उद्योगांनी पुन्हा एकदा चांगली भरारी घेतली आहे. परंतु, लॉकडाऊनच्या चर्चेने चिंता वाढली आहे. असे असले तरी किमान उद्योजकांना यातून सूट मिळावी.
-घनश्याम गोयल, स्टील उद्योजक
जिल्ह्यातील लहान मोठे व्यापारी लाॅकडाऊननंतर हळूहळू व्यवसाय वृध्दी करत आहेत. परंतु, पुन्हा लाॅकडाऊन लागल्यास ग्रामीण भागातील छोटे व्यापारी अडचणीत येणार आहेत.
हस्तीमल बंब, व्यापारी महासंघ
लाॅकडाऊनमध्ये अन्य कंपन्यांप्रमाणेच बांधकाम व्यवसायाला सूट देण्यात यावी, जेणेकरून या क्षेत्रात कुशल आणि अकुशल असे कामगार आहेत. याचा विचार व्हावा.
धीरेंद्र मेहरा, बांधकाम व्यावसायिक