जालना : महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ सखी वनस्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. जून- २०१९ मध्ये सुरू झालेल्या या सेंटरमध्ये आजवर १७३ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील ६३ प्रकरणात तडजोड करण्यात आली आहे. तर २० प्रकरणे प्रलंबित आहेत.
महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून संकटग्रस्त महिलांना तातडीने सेवा मिळावी, या हेतूने वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. जालना येथील वनस्टॉप सेंटरचे कामकाज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, महिला, बालविकास अधिकारी इंदू परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आजवर या केंद्रात एकूण १७३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. संकटग्रस्त महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर या केंद्राच्या वतीने यातील ६३ प्रकरणात तडजोड करण्यात आली आहे. १८ प्रकरणांत पोलीस मदत तर ५१ प्रकरणे संरक्षण अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
कौटुंबिक हिंसाचाराच्या अधिक तक्रारी
या सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आजवर सर्वधिक तक्रारी या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील दाखल झाल्या आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील तक्रारींचे तातडीने निरसन करून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी या सखी वन स्टॉप सेंटरमधील टीम काम पाहत आहे.
शिवाय अत्याचार पीडित महिलाही येथे तक्ररी करण्यासाठी येत आहेत. अशा महिलांना वैद्यकीय सेवा देऊन निवाराही उपलब्ध करून देण्याचे काम या सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. त्याशिवाय विविध हक्काबाबतही तक्रारी या ठिकाणी येत आहेत.
या केंद्राकडून काय काम केले जाते?
संकटग्रस्त महिलांसाठी हे केंंद्र २४ तास सुरू ठेवले जाते. संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सेवा मिळवून देणे, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करणे, न्यायालयात अर्ज करून संरक्षण आदेश, आर्थिक साहाय्य, नुकसानभरपाई आदेश, ताबा आदेश, निवास आदेश मिळवून देणे, पोलीस ठाण्याबाबत कायदेशीर मदत, अत्याचार पीडित महिलांना वैद्यकीय उपचार देणे आदी विविध सेवा या केंद्रातून दिल्या जात आहेत.
सखी वन स्टॉप सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी प्रशासन आणि संकटग्रस्त महिलांमधील दुवा म्हणून काम करीत आहेत. संकटग्रस्त महिलांना गरजेनुसार तात्काळ वैद्यकीय सेवा व निवारा देण्याचे काम येथे केले जाते.
शिवाय पीडित महिलांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार मिळवून दिला जातो. शिवाय पोलीस ठाणे प्रकरणात कायदेशीर सेवा मिळवून देणे, कौटुंबिक प्रश्न सोडविण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे.
तक्रारी
१७३
एकूण
६३
तडजोड
१८
पोलीस मदत
५१
संरक्षण
२५
निवारा
११
वैद्यकीय सेवा