काठमांडू : नेपाळच्या ईशान्य भागात प्रचंड दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत २०० जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय, या भूस्खलनामुळे सुनकोशी नदीचा प्रवाह अडल्याने एक भलामोठा तलाव निर्माण झाला आहे. परिणामी, नेपाळ तसेच भारतातही अनेक गावांना भीषण पुराचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळच्या सिंधुपालचौक जिल्ह्यातील मांखा गावावर शनिवारी एक मोठी टेकडी कोसळून १०० घरे गाडली गेली. या दुर्घटनेत २०० नागरिक बेपत्ता झाले आहेत. सुनकोशी नदीचा प्रवाह अडून निर्माण जालेल्या तलावाची लांबी २.५ किमी तर खोली १३० मीटर आहे. हा तलाव कधीही फुटण्याची भीती असल्याने आसपासच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. या तलावातील पाणी सोडून देण्यासाठी नेपाळी लष्कराने दरडीच्या ढिगाऱ्यात कमी तीव्रतेचे स्फोट घडवून आणले. त्यामुळे पाण्याला वाट मिळताच बिहारच्या कोसी नदीची पातळी धोकादायकपणे वाढली आहे. बिहार सरकारने शनिवारीच अतिसतर्कतेचा इशारा जारी करून सखल भागातील नागरिकांना हलवण्याचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)
नेपाळमध्ये ‘माळीण’
By admin | Updated: August 4, 2014 04:00 IST