वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले ट्विट व समाजमाध्यमांतून केलेली अन्य भाष्येही अधिकृत सरकारी रेकॉर्र्ड म्हणून जतन करून ठेवणे सक्तीचे करण्यासाठी एका कायद्याचे विधेयक सोमवारी अमेरिकी काँग्रेसमध्ये सादर केले गेले.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच एका ट्विटमध्ये स्पेलिंगमध्ये चूक करून ‘कॉवफेफे’ (सीओव्हीएफईएफई) असा एक निरर्थक शब्द वापरल्याने बरीच टीका झाली होती. आता काँग्रेसमध्ये मांडलेल्या ‘कम्युनिकेशन्स ओव्हर व्हेरिअस फीड््स इलेक्ट्रॉनिकली फॉर कम्युनिकेशन’ या विधेयकाच्या नावाचे इंग्रजी लघुरूपही ‘कॉवफेफे’ असेच होते.प्रतिनिधी सभेतील इलिनॉय राज्यातील डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधी माईक क्विगले यांनी हे विधेयक मांडले असून त्याद्वारे अध्यक्षीय अभिलेख कायद्यात सुधारणा करून राष्ट्राध्यक्षांनी केलेली ट्विट व समाजमाध्यमांतून व्यक्त केलेली अन्य मतेही अधिकृत सरकारी रेकॉर्ड म्हणून राष्ट्रीय अभिलेखागारात जतन करून ठेवणे सक्तीचे करणे प्रस्तावित करण्यात आले आहे.असा कायदा करण्याची गरज अधोरेखित करताना क्विगले यांनी एका निवेदनात म्हटले की, धोरणात्मक घोषणा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष समाजमाध्यमांचा वापर करणार असतील तर त्यांनी या स्वरूपात केलेली विधानेही भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवण्याची तरतूद करणे गरजेचे आहे. टष्ट्वीट हे अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असून, अशा प्रत्येक पोस्टसाठी राष्ट्राध्यक्षांना जबाबदार धरता यायला हवे.राष्ट्राध्यक्ष सध्या एकदा केलेले ट्विट नंतर डीलिट करू शकतात व ट्रम्प यांनी अशी अनेक ट्विट यापूर्वी डीलिट केलीही आहेत. मात्र हा कायदा मंजूर झाल्यास, त्यांना असे करता येणार नाही, कारण समाजमाध्यमांत एकदा टाकलेले पोस्ट डीलिट करण्यास त्यात मज्जाव करण्यात येणार आहे.ट्रम्प यांची ट्विट राष्ट्राध्यक्षांनी म्हणून अधिकृत विधाने असतात व ती तशाच स्वरूपात समजली जायला हवीत, असे व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी सीन स्पाइसर यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. या नव्या विधेयकावर व्हाइट हाऊसने भाष्य केले नसले तरी स्पाइसर यांच्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक महत्वाचे ठरू शकते. (वृत्तसंस्था)टष्ट्वीटबहाद्दर ट्रम्पराष्ट्राध्यक्ष ट्रम्प ट्विटरवर खूप सक्रिय असून टीकाकारांवर आणि खास करून माध्यमांवर तोंडसुख घेण्यासाठी ते ट्विटरचा उपयोग करीत असतात. @realDonaldTrump असे त्यांचे व्यक्तिगत ट्विटर हॅण्डल असून त्यांचे ३.२० कोटींहून अधिक फॉलोअर आहेत. ३१ मे रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी ‘कॉवफेफे’ असा शब्द वापरला होता.त्याचा नेमका अर्थ काय यावरून बरेच तर्क वितर्क केले गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी ते ट्विट डीलिट केले होते. नंतर पुन्हा ट्विट करून त्यांनी, ’‘कॉवफेफे’ चा खरा अर्थ कोणाला तरी कळला का? बस्स, मजा करा!’, असे म्हटले होते.
राष्ट्राध्यक्षांनी केलेली ट्विटही जतन करण्यासाठी कायदा?
By admin | Updated: June 14, 2017 03:56 IST