भरधाव वाहनांवर कारवाईची गरज
हिंगोली : शहरात दुचाकी वाहने चालिवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांच्या हातीही दुचाकी दिली जात आहे. अनेकवेळा लहान मुले भरधाव वाहने चालवीत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. पोलीस जिल्हाभरात कारवाईची मोहीम राबवीत आहे. मात्र तरीही अनेक जण पोलिसांना गुंगारा देत वाहने भरधाव चालवीत आहेत. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर वाहने उभी
हिंगोली : शहरातील काही प्रमुख मार्गावर अनेक चालक वाहने उभी करीत आहेत. अनेक तास वाहने एकाच ठिकाणी उभी राहत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. अनेकवेळा वादाचे प्रकार घडत आहेत. रस्त्याच्या कडेला धोकादायकरीत्या वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
शेळीपालन व्यवसायाला पसंती
हिंगोली: जिल्हाभरात लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय कोलमडून पडले आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यातून सावरण्यासाठी अनेकांनी शेळीपालनाचा व्यवसाय करण्याला प्राधान्य दिले आहे. विविध कंपनीतून गावाकडे परतलेले ग्रामीण भागात युवक आता शेळीपालन करीत असल्याचे चित्र आहे. यातून चांगला नफा मिळत असल्याचे अनेक शेळीपालक सांगत आहेत.
टोमॅटो उत्पादक शेतकरी त्रस्त
हिंगोली : जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. जमिनीत ओलावा व सिंचनासाठी पाणी असल्याने पीक चांगले आले आहे. मात्र अनेक ठिकाणी टोमॅटो पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
विद्युत तारा लोंबकाळल्या
हिंगोली : तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. विंधन विहिरी, विहिरींना पाणी असल्याने पिकांना दिले जात आहे. मात्र ज्या विद्युत खांबावरून वीज घेतली आहे, अशा खांबांना जोडणाऱ्या विद्युत तारा अनेक ठिकाणी लोंबकळल्या आहेत. यामुळे धोका निर्माण होत आहे. शिवाय अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. याकडे लक्ष देऊन वीजतारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
कळमनुरी : तालुक्यातील माळेगाव, आराटी, घोळवा फाटा येथून प्रवाशांची ये-जा असते. मात्र या ठिकाणी प्रवासी निवारे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जवळ पक्का निवारा नसल्याने पावसाळा व उन्हाळ्यात प्रवाशांना झाडाचा सहारा घ्यावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन या ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवा
कळमनुरी : तालुक्यात सध्या अनेक भागात रात्रीला शेतात वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीला शेतात जावे लागत आहे. यातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे शेतकरी वैतागले असून दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.