हिंगोली जिल्ह्यात श्रावण महिन्यात विविध ठिकाणच्या महादेव मंदिराच्या पायरीचे दर्शनच घेऊन जाण्याची वेळ भाविकांवर आली होती. कोरोनाचा कहर हिंगोली जिल्ह्यात बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी अजूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही. त्यामुळे शासनाकडून काही उपाययोजना, प्रतिबंध अजूनही कायम ठेवण्यात आलेले आहेत. त्यातच श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. तर शिव भक्तांची संख्या मोठी असल्याने शिवालयांमध्येही मोठी गर्दी असते. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यातच विविध धार्मिक स्थळांची उलाढालही ठप्प झाली आहे. याचा फटका त्या त्या ठिकाणच्या अर्थकारणाला बसला आहे. यामुळेही मंदिरे उघडण्याची मागणी होऊ लागली आहे.
आधी कोरोना संपू दे - बांगर
हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, राज्यातील कोरोना संपू दे, असे देवाला साकडे घातले आहे. लोकांचा जीवही तेवढाच महत्त्वाचा आहे. कोरोना संपला की, मंदिरे खुली होतीलच. तोपर्यंत सबुरीने घेतले पाहिजे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.
लोकांचा जीव महत्त्वाचा- बोंढारे
आपल्याकडे धार्मिक भावना प्रखर आहे. मंदिरे उघडली की, गर्दीने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. दुसरीकडे लोकांचा जीवही महत्त्वाचा आहे. कोरोना संपल्यावरच मंदिरे उघडावीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी दिली.
महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यातही मंदिरे बंद आहेत. मात्र कोणी आंदोलन केले म्हणून जनतेचा जीव धोक्यात घालता येत नाही. त्यामुळे कोरोना संपल्यावरच मंदिरे उघडावीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली.
सगळे सुरू, मंदिरेच का बंद?
सगळे सुरू केले. कोरोनाही कमी झाला. मग, मंदिरेच का बंद केली जात आहेत. सरकार जाणीवपूर्वक धार्मिक भावनांशी खेळत आहे. यात लघुउद्योग लयाला जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.
चार कोटींवर उलाढाल ठप्प
हिंगोली जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदिर, नर्सी येथील नामदेव मंदिर व इतर शेकडो मंदिरांजवळ किरकोळ विक्रेत्यांना बेल, फूल, हार, प्रसाद आदींची चार ते पाच कोटींची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे.
अनेक मंदिरासमोरील या विक्रेत्यांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला आहे. मंदिरे सुरू होण्यासाठी त्यांना अजूनही आस आहे.