हिंगोली : जिल्ह्यात अनेक बोगस डाॅक्टर रूग्णांवर उपचार करीत असल्याचे वास्तव आहे. असे असताना बोगस डाॅक्क्टरांचा शोघ घेणाऱ्या समित्यांकडे तक्रार आली तरच समिती कारवाईचे पाऊल उचलते. त्यामुळे बोगस डाॅक्टरांचे फावत आहे.
बोगस डाॅक्टरांच्या चुकीच्या निदानामुळे रूग्णांना गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे अशा डाॅक्टरांवर आळा बसावा यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर समिती असते. मात्र समितीकडे तक्रार आल्यानंतरच ही समिती बोगस डाॅक्टरावर कारवाई करीत आहे. यामुळेच ग्रामीण भागात तर कम्पाऊंडर म्हणून काम करणारेही रुग्णांवर उपचार करीत आहेत. याची समितीमधील सदस्यांना कल्पना असतानाही कारवाई मात्र होत नाही.
एका तालुक्यात एकही कारवाई नाही
बोगस डाॅक्टरांचा शोध घेणाऱ्या समितीकडे तक्रार आल्यानंतर बोगस डाॅक्टरवर कारवाई केली जाते. वर्षभरात वसमत, हिंगोली तालुक्यात प्रत्येकी १ तर औंढा, सेनगाव तालुक्यात प्रत्येकी दोन बोगस डाॅक्टर कारवाई करण्यात आली. तर कळमनुरी तालुक्यात एकही कारवाई झाली नाही.
तालुका समितीत कोण कोण असते?
तालुकास्तरीय समितीमध्ये तहसीलदार, बीडीओ, पोलीस निरीक्षक, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींचा समावेश असतो.
तालुका आरोग्य अधिकारी
बोगस डाॅक्टर असल्याबाबत समितीकडे तक्रार आल्यानंतर तक्रारीची शहानिशा करून संबंधित बोगस डाॅक्टरवर कारवाई केली जाते. त्यानंतर कारवाईचा अहवाल जिल्हा समितीकडे पाठविला जातो.
-- डाॅ. नामदेव कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी. हिंगोली
कोरोना काळात रुग्णांच्या जीवाशी खेळ
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा अनेक खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. साधा आजार असला तरी शासकीय दवाखान्यात पाठविले जात होते. त्यामुळे ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांनी हात धुऊन घेतला. यात कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्यांचाही समावेश होता.
वर्षभरात कोणत्या तालुक्यात किती कारवाया?
वसमत ०१
औंढा ०२
सेनगाव ०२
हिंगोली ०१
कळमनुरी ००