गोंदिया : शेतकऱ्यांच्या समस्यांवर ढोंग करणारे आज सत्तेत आले. निवडणुकीच्या वेळी धानाच्या भावात वृद्धी, बेरोजगारीची समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आता १८ महिन्यांच्या काळात त्या आश्वासनांचे काय झाले हे जनतेने त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. सत्ता मिळताच त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचा टोला खासदार प्रफल पटेल यांनी लगावला. अर्जुनी येथील नगर पंचायत निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला आमदार राजेंद जैन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रीकापुरे, नामदेव डोंगरवार, हेमंत भांडारकर, किशोर तरोणे, यशवंत परशुरामकर, चित्रलेखा मिश्रा, सुधीर वासवानी, उद्धव मेहंदळे, रतिराम राणे, जे.टी.काळसर्पे, विनोद चांदेवार, सोमदास गणवीर, पुरूषोत्तम घाटबांधे, श्रीदान पालीवाल, शीला उके, राकेश जायस्वाल, हलमारे, गोवर्धन ताराम, घुसाजी मेश्राम, भाऊदास खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, स्वत:ला लोकनेता व भूमीपूत्र म्हणवून जनतेला खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखविण्यात आले. आम्हाला येथील नागरिकांच्या समस्यांची पूर्ण जाणीव असून त्याचप्रकारे आम्ही निरंतर विकासासाठी कार्य करीत आहोत. आमच्या सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना धानावर बोनस, बीआरजीएफ, घरकुल यासरख्या अनेक जनकल्याणकारी योजना यांनी बंद केल्यात. अशाप्रकारेच हे सत्ताधारी अच्छे दिन आणणार काय असा सवालही त्यांनी केला. खासदार पटेल म्हणाले, तुम्ही गावातील जनप्रतिनिधींना विकास कामांचे काय झाले, कल्याणकारी योजना बंद काऊन झाल्या याबाबत विचारायला हवे. लालदिव्याच्या गाडीत बसून माणूस मोठा होत नसून काम केल्याने मोठा होतो. आज सामान्य माणसाला धान्य, केरोसीन मिळत नाही, डाळ २०० रूपये किलो पोहोचली, महागाई आपल्या चरमसिमेवर आली असून अशाप्रकारेच ते अच्छे दिनचा वादा निभावत आहेत. मोदीची आपल्या मनातली गोष्ट बोलून देतात व जनता त्यांचे म्हणणे ऐकते. मात्र जनतेच्या मनातील गोष्ट या सरकारमध्ये ऐकणारा कुणीच नाही. पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, आमच्या शासनकाळात आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती दिली. ती सर्व कामे आता ठप्प पडून आहेत. कारण जनतेच्या समस्यांशी भाजप जनप्रतिनिधींना काहीच घेणे-देणे नाही. करिता अर्जुनीच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
सत्ता मिळताच त्यांना पडला शेतकऱ्यांचा विसर
By admin | Updated: October 27, 2015 02:07 IST