गोंदिया : संभाव्य तिसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांना बूस्टर डोसचे नियोजन शासनाकडून केले जात आहे. असे असताना मात्र जिल्ह्यातील ५८ टक्केच आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा दुसरा डोस घेतल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच, आरोग्य कर्मचारीचे दोन्ही डोस झालेले नसताना त्यांना बूस्टर डोस कसा देता येणार हा प्रश्न पडतो. शिवाय, नागरिकांना लसीकरणासाठी सांगितले जात असताना मात्र खुद्द आरोग्य कर्मचारीच लसीकरणाला हुलकावणी देताना दिसून येत आहेत.
संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असून, अशात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण झाल्यास तिसरी लाट थोपविता येणार असेही सांगितले जात आहे. याकरिता लसीकरणाची मोहीम जिल्ह्यातही जोमात राबविली जात असून, आतापर्यंत ६५ टक्क्यांच्या वर लसीकरण करण्यात आले आहे. मात्र धक्कादायक बाब अशी की, नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी सांगितले जात असतानाच खुद्द आरोग्य कर्मचारीच लसीकरणाला हुलकावणी देताना दिसत आहे. कारण, आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ टक्केच आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
सर्वसामान्य नागरिक आता लसीकरणासाठी पुढे येत असल्याने जिल्ह्यात बुधवारपर्यंत ८४६७३४ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची ६५ एवढी टक्केवारी आहे. यात ६४२८०७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ४९ एवढी टक्केवारी आहे; तर २०३९२७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची १६ एवढी टक्केवारी आहे. यावरून सर्वसामान्य नागरिक लसीकरणासाठी पुढे येत असून आरोग्य विभाग त्यांचे लसीकरण करीत आहे. मात्र लसीकरणाची जबाबदारी असणारे स्वत:च लसीकरणाबाबत उदासीन आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
------------------------------
दुसरा डोस झालाच नाही तर बूस्टर डोस कसा?
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना डेल्टा व्हेरिएंटची बाधा झाली आहे. बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांत कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत. मात्र त्यांना विलगीकरणात जावे लागले. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून आता आरोग्य कर्मचाऱ्यांची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी त्यांना बूस्टर डोस देण्याबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
------------------------------
शंभर टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण नाहीच
जिल्ह्यात १०५८० आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद आहे. लसीकरणात त्यांनाच प्राथमिकता देण्यात आली असूनही आतापर्यंत १०२८४ कर्मचाऱ्यांनीच पहिला डोस घेतला असून त्याची ९७.२० एवढी टक्केवारी आहे; तर ६१४३ कर्मचाऱ्यांनीच दुसरा डोस घेतला असून त्याची ५८.०६ एवढी टक्केवारी आहे. म्हणजेच, लसीकरणात प्राधान्य असूनही आरोग्य कर्मचारी खुद्द लसीकरणाला हुलकावणी देत असल्याचे दिसून येत आहे.