एटीएममध्ये सुविधांचा अभाव
गोंदिया : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एटीएममध्ये अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी वॉचमन कार्यरत नसल्याने नागरिकांमध्ये धास्ती आहे. सॅनिटायझर तसेच निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे.
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. हे अन्य व्यवसायांबाबत दिसून येत असून, ग्रामीण कारागीरसुध्दा अडचणीत आहेत.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगावबांध : वन्य हिंस्त्र प्राण्यांनी शेतशिवार व गाव परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी करणे किंवा त्या प्राण्यांना ठार करणे सुरू केले आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या धुमाकुळामुळे जंगलप्रवण व त्यास लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे गरजेचे असले तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील मजुरांच्या हाताला कामे केव्हा
अर्जुनी - मोरगाव : येथे नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यापासून गेल्या ५ वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोची कामे मिळाली नाहीत. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे भविष्य व उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने शहरातील मजुरांना मग्रारोहयोची कामे देण्यात यावीत, अशी मागणी करीत राष्टवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना निवेदन देण्यात आले.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोंदिया : टाळेबंदीमुळे कित्येकांचा रोजगार हिरावला. गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा केले होते.
शासन मंजूर करणार रेशन व केरोसीन परवाने
गोंदिया : ग्रामीण भागात रेशन दुकाने व केरोसीनचे परवाने देण्यासाठी संबंधित गावातील ग्रामसभेचा ठराव आवश्यक होता. मात्र, आता ग्रामसभांच्या ठरावाशिवाय शासन परवाने मंजूर करणार आहे.
नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या. त्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहते.
शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे
केशोरी : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीजबिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्र बसविण्याकडे वळत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
गोरेगाव : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आली असली तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. आवागमनास अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अभयारण्यामुळे शेतजमिनी ओसाड
गोंदिया : जल, जंगल, जमीन, प्राणी यांचे संवर्धन करताना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्याची निर्मिती आवश्यक असली तरी मानवी हिताचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. उमरेड - पवनी - कऱ्हांडला अभयारण्यात समाविष्ट असलेल्या शेतजमिनीचे अधिग्रहण अद्याप झाले नाही.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
गोंदिया : कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी सरकारने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून काही लोकांना लाभ मिळाला. मात्र, शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवूनही अनेकांना योजनेचा लाभ मिळाला नाही.