तेंदूपत्ता संकलकांचे कृत्य : रेंगेपार सहवनक्षेत्रातील घटनासडक अर्जुनी : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना आग लागणे ही नित्याचीच बाब ठरली आहे. मोहफूल वेचणारे लोक मोह वेचण्यासाठी आगी लावतात अशी शंका होती, पण दि.५ ला सायंकाळी तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून गाव खेड्यातील लोकांना अल्पशा मजुरीत जंगलाला वनवा लावण्यासाठी पाठविले जात असल्याची घटना उघडकीस आली.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र रेंगेपारमधील शशीकरण पहाडीला आग लावताना दोन इसामांना रंगेहात पकडले. त्यात तालुक्यातील प्रधानटोला येथील आरोपी नामदेव जैपाल रहांगडाले (वय ४५), कुवरलाल सुकल ठाकरे (वय ३७) यांना पकडण्यात यश आले. या आरोपींकडे आगपेटी मिळाली आहे. सायंकाळी गस्तीवर असताना वनक्षेत्र अधिकारी प्रमोद फुले, वनरक्षक विनायक नागरिकर, संगीता काठेवार, कोहमाराचे वनक्षेत्र सहायक सुनील खांडेकर, वनरक्षक अरविंद बडगे, रमेश काळबांधे, विलास गौतम, वनमजुर बेलवंशी, भोंडे, खोटेले, रमेश मेश्राम यांनी आरोपींना पकडण्यासाठी सहकार्य केले.सदर दोन्ही आरोपी सायंकाळी चार वाजता जंगलाला आग लावण्यासाठी निघाले. ५.३० वाजता जंगलाच्या बाहेर निघत असताना दोघांनाही पकडण्यात आले. त्यावेळी जंगलात आग लागली होती. पण वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली. त्या आरोपींना जंगलाला आग लावण्यासाठी सांगितले कुणी? तो सांगणारा कोण? तेंदूपत्ता संकलन करणारी कंपनी कोणती? याची उत्तरे तपासात पुढे येत आहेत. जंगलाना आगी लावणारे लोक उन्हाळ्याचे दिवसात तत्पर असतात. आगी लावल्याने तेंदूच्या लहान झाडांना नवीन पालवी फुटते. तेंदू झाडे कटाईचे काम केल्या जातात. पण आगी लावल्याने मजूर न लावता कमी पैशात काम होत असल्याने ही आग लावली जात असावी अशी चर्चा आहे. जंगलाना आगी लावल्याने लहान मौल्यवान रोपटे मरतात. मोठ्या झाडाच्या बिया पडल्या असतात त्या जळून खाक होतात. त्यामुळे पुन्हा जंगलात नवीन रोपटे तयार होत नाही. जंगल विराण होते. आगीमुळे प्राणी सैरावैरा पळतात, काही प्राणी आगीमुळे भाजतात तर कधी जीव गमवावा लागतो. या आगीत लहान किटक मरतात. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांची पंचाईत होत असते. उन्हाळ्याचे दिवसात प्राणी पाण्यासाठी जंगलात भटकत असतात. (शहर प्रतिनिधी)
जंगलात आग लावणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:29 IST