संतोष बुकावन ल्ल अर्जुनी/मोरगावपर्यटनाच्या दृष्टीने सिरेगावबांध हे गाव महत्वपूर्ण स्थान आहे. गोंदिया, भंडारा व इतर जिल्ह्यातील पर्यटक नवेगावबांधला भेट देत असताना येथे आवर्जून थांबतात. या पर्यटनस्थळाला आणखी विकसीत केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधींची आस्था असली पाहिजे. विदेशी पक्षांचे हे वास्तव्यस्थान आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत्या पक्षी शिकारींमुळे पक्षीसुध्दा फिरकेनासे झाले आहेत. आ. राजुकमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांपैकी सिरेगावबांध हे एक गाव आहे. या गावात विकास करण्यासाठी बराच वाव आहे. विकासासाठी हे गाव दत्तक घेणे खरच कौतुकास्पद आहे. पण पर्यटनाला वाव असलेल्या या गावाला पर्यटनाच्या नजरेतून बघितल्याच गेले नाही. १२०० लोकसंख्या असलेले हे गाव निसर्गरम्य वातावरणात आहे. येथील गावकऱ्यांचा शेती व मजुरी हा मुख्य व्यवसाय आहे. या गावात शेतीशिवाय दुसरे रोजगाराचे साधन नाही. गावकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी प्रतीक्षेत असतात. दरवर्षी येथे मग्रारोहयोजनेची कामे होतात. परंतु नोंदणीकृत कुटुंबांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात यंत्रणेला अपयश आले. ‘गोद मे लडका और गाव में पुकार’ असाच हा प्रकार आहे. निसर्गाने दिलेल्या संपदेला विकसित करून येथे रोजगाराला चालना मिळू शकते. पर्यटनस्थळी तलावात शासनाला खर्च करणे शक्य नसेल तर खिंडसीसारखे बीओटी तत्वावर नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथे गावकऱ्यांना रोजगार मिळू शकतो. सिरेगावबांध येथे गावअंतर्गत रस्ते काहीशा प्रमाणात सिमेंटीकरण व खडीकरणाने पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही तीन ते साडेतीन किमी रस्ते कच्चे आहेत. दोन किमीचे नाली बांधकाम शिल्लक आहे. वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांना अद्याप पट्टे मिळाले नाहीत. येथील स्मशानघाटावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. मात्र बैठकीसाठी सभामंडप, चावडी नसल्याने विशेषत: उन्हाळा व पावसाळ्यात त्रास होतो. ग्रामपंचायतच्या वतीने सिरेगाव ते गुढरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदारांना निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही ही मागणी पूर्ण झाली नाही. गावातील एका बड्या व्यक्तीच्या घरासमोर असलेल्या नालीतून दुर्गंध सुटतो. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्यांनी ग्रां.प. कडे तक्रार केली. ग्रा.पं.ने नोटीस बजावली, मात्र अद्यापही यावर तोडगा निघू शकला नाही. सिरेगाव व नजीकच्या सात गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. मात्र या योजनेला शासकीय अनुदान नाही. नियोजन, देखभाल व दुरूस्तीसाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले. त्यांच्यामार्फत ही योजना चालते. ज्या नळधारकांनी कनेक्शन घेतले आहे, अशा लोकांकडून पैसे गोळा करून ही योजना चालविली जाते. मात्र जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी अनुदान मिळत नसल्याने योजना पुढे चालविण्यासाठी बराच त्रास होतो.
पर्यटनाला वाव; मात्र विकासाचा ध्यास नाही
By admin | Updated: August 13, 2014 23:56 IST