गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वर-खाली होत असून, एकंदर स्थिती आटोक्यात असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, क्रियाशील रुग्णांची संख्या आता बोटावर मोजण्या इतपत उरली आहे. मात्र विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा आता आटोक्यात आला आहे. तिरोडा तालुक्यात आता फक्त ४ क्रियाशील रुग्ण उरले असून, आता लवकरच हा तालुका ‘कोरोनामुक्त’ होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात आढळून आले आहेत. गोंदियानंतर तिरोडा तालुका दुसऱ्या क्रमांकावर होता व हे दोन तालुके जिल्ह्यातील ‘हॉटस्पॉट’ ठरले होते. गोंदिया तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्णांची नोंद घेतली जात असून, तालुका सुरुवातीपासून आजही हॉटस्पॉट आहे. गोंदिया तालुक्यात आतापर्यंत ७,८१२ बाधितांची नोंद घेण्यात आली असून, आजही दररोज रुग्ण आढळत आहेत. परिणामी, तालुक्यात सर्वाधिक ८६ क्रियाशील रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून येथे १,३९६ बाधितांची नोंद आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, आता तिरोडा तालुक्यात बाधितांचे प्रमाण कमी झाले असून म्हणूनच तालुका आटोक्यात आल्याचे दिसत आहे. आता तालुक्यात फक्त ४ क्रियाशील रुग्ण उरले आहेत व त्यातील २ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत.
उपरोक्त आकडेवारी बघता तिरोडा तालुका नियंत्रणात आलेला दिसून येतो. याशिवाय, जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांतही १० च्या आत बाधित रुग्ण असून हे तालुकेसुद्धा कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. मात्र आमगाव तालुक्यात बाधितांची संख्या व क्रियाशील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळेच आता आमगाव तालुक्यात १७ क्रियाशील रुग्ण असून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अधिक खबरदारी घेतल्यास लवकरच जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार यात शंका नाही.
--------------------------------
त्रिसूत्रीवर अंमलबजावणी गरजेची
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून दररोज निघणारी बाधितांची संख्या दिलासादायक दिसून येत आहे. मात्र ही संख्या शून्यावर आलेली नाही. म्हणजेच कोरोना पूर्णपणे गेला नसून बघता-बघता मृतांची संख्या १८२ पर्यंत पोहोचली आहे. अशात कोरोना अद्याप जिल्ह्यात असल्याने त्याला पूर्णपणे मूठमाती देण्यासाठी कोरोनाविषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मास्कचा नियमित वापर, शारीरिक अंतराचे पालन व सतत हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.