इंटरनेट कनेक्शनची गरज : अनारक्षित तिकीट घेण्याची सोय देवानंद शहारे गोंदिया दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे इंटरनेट कनेक्शन असलेल्या स्मार्ट फोनद्वारे अनारक्षित तिकिटांच्या बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या ज्या स्थानकांवर आॅटोमेटिक तिकीट व्हेंडर मशिन किंवा क्वॉईन तिकीट व्हेंडर मशिनची (एटीव्हीएम/कोटीव्हीएम) सुविधा त्या स्थानकांवर उपलब्ध करण्यात आली आहे आहे. गोंदिया स्थानकावर शुक्रवारी (दि.७) प्रायोगिक तत्वावर या प्रणालीने एक तिकीट काढून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात १२ स्थानकांमध्ये एटीव्हीएम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात गोंदिया, राजनांदगाव व इतवारी स्थानकात कोटीव्हीएमची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने व त्वरित तिकीट प्राप्त करण्यासाठी तिकीट काऊंटरवर लागणाऱ्या रांगापासून मुक्ती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. या सुविधेमुळे प्रवास तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, सीजनल तिकिटांचे नविनीकरण केले जाऊ शकते. इंटरनेट कनेक्शनच्या सुविधेसह जीपीएस सक्षम अॅन्ड्राईड/विण्डोज मोबाईल फोन उपयोगात आणणारे या सोयीचा लाभ घेवू शकतात. तिकीट बुकिंग स्थानक परिसराच्या बाहेर कुठुनही केली जाऊ शकते. ही सुविधा सर्व एटीव्हीएम-कोटीव्हीएममध्ये उपलब्ध राहील. तसेच तिकिटांची बुकिंक भारतीय रेल्वेच्या कुठल्याही कोणत्याही स्थानकासाठी केली जाऊ शकते. यात एकल, प्लॅटफॉर्म व सीजन असा तिकिटांचा प्रकार आहे. प्रवासाची वैधता प्रिंटेड तिकीट सोबत ठेवल्यावरच शक्य आहे. त्यासाठी प्रवाशांना एटीव्हीएम/कोटीव्हीएम किंवा बुकिंक काऊंटरमधून तिकीट प्रिंट करून घेणे अनिवार्य आहे. अशी तिकीट जवळ नसल्यास रेल्वेच्या नियमानुसार प्रवाशाला दंडित केले जाऊ शकते. यात प्लॅटफार्म तिकीट दोन तासांसाठी वैध राहील. प्रवासी तिकीट बुक करण्याच्या एका तासाच्या आत प्रवास सुरू करावा लागेल. तर सीजन तिकीट जारी केलेल्या तारखेच्या पुढील दिवसी प्रवास सुरू करावा लागेल. एकाच वेळी चार प्रवासी द्वितीय श्रेणीचे तिकीट बुक करू शकतात. तसेच नियमित मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बुकिंगची सुविधा आहे. तिकिटांचे रद्दीकरण वेळ कालावधीची समाप्ती किंवा तिकिटाचे प्रिंट आऊट घेण्याच्या पूर्वी करावे लागणार आहे.त्यावर सामान्य रद्दीकरण शुल्क लागू राहील. मासिक तिकीटधारकांसाठी मासिक तिकीटधारकांना प्रवासादरम्यान मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तिकिटाचे प्रिंट आऊट घेण्यासाठी एटीव्हीएम/कोटीव्हीएम येथे जावून आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा बुकिंग आयडी नोंद करून प्रिंटआऊट घ्यावे लागेल. एटीव्हीएम/कोटीव्हीएम खराब झाल्यास बुकिंक आॅफिसमध्ये जावून तिकिटाचे प्रिंट आऊट घ्यावे लागेल. नागरिकांच्या फेऱ्यावर कोणतीच कार्यवाही नाही लिफ्ट व एस्कलेटरच्या कामामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना अर्धा किलोमीटरचा फेर घेत प्लॅटफॉर्मावर जावे लागते. यातूनच दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला. परंतु त्यावर रेल्वे प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
आजपासून स्मार्ट फोनद्वारे तिकीट बुकिंग
By admin | Updated: April 8, 2017 00:49 IST