सालेकसा : आदिवासी समाजाचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या कचारगड येथील गुफेत जाण्यासाठी भाविकांना आणि पर्यटकांना आता होत असलेला त्रास कमी होणार आहे. या खडतर मार्गावर आता पायऱ्यांच बांधकाम करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सोमवारी झाले.देशाच्या अनेक राज्यातून कचारगड येथे भाविक येतात. त्याचप्रमाणे कचारगड येथील गुफा ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून ती बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकसुध्दा उत्सुकतेपोटी येत असतात. त्या लोकांना येथे आल्यावर त्रास सहन करावा लागणार नाही. या हेतुने कचारगडला सर्व सोयी सुविधायुक्त करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. कचारगड येथे देवस्थान व गुफेकडे जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पायऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमगावचे आ.संजय पुराम,जिल्हाधिकारी अमित सैनी, मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी.शिंदे, जि.प. समाजकल्याण सभापती कुसन घासले, महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स. सालेकसाचे सभापती छाया बल्हारे, जि.प. सदस्या कल्याणी कटरे, कोसतर्रा येथील सरपंच पूजा वरकडे, एस.डी.ओ. सोनवाने, प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात संबोधित करताना आ.संजय पुराम म्हणाले की, वर्षानुवर्षे उपेक्षीत असलेला आदिवासी समाज विकास साधण्याकरीता शासनस्तरावर शर्तीचे प्रयत्न केले जातील. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांनी बिरसा मुंडा, माँ काली कंकाली यांच्या छायाचित्राला अभिवादन केला. आश्रमशाळा जमाकुडो येथील मुलींनी सुरेख गीतानी पाहुण्याचे स्वागत केले. दुपारी १ वाजता होणारा कार्यक्रम मंत्री महोदयाच्या दिवसभराच्या व्यस्ततेमुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथे संपन्न झाला. तोपर्यंत सर्व स्थानिक पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी संयम ठेवून प्रतीक्षा करीत राहीले. नक्षलग्रस्त भाग असलेल्या मुळे सालेकसाचे ठाणेदार संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कचारगड समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी मांडले. कचारगडच्या विकासात सर्वानी हातभार लावण्याचे आवाहन केले. संचालन विजय बघेले यांनी केले तर आभार सहायक प्रकल्प अधिकारी पी.एन.रघुते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांच्या मार्गदर्शनात डी.बी.उईके, मिनाक्षी उनाडे, टी.के. मडावी, शिवलाल सयाम, संतोष पंधरे, कृष्णा जनबंधू, शंकर मडावी, टी.एस. तुरकर आदीनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
कचारगडची वाट होणार सुकर
By admin | Updated: January 6, 2015 23:02 IST