आमगाव : कोरोनाची पहिली व दुसरी लाट आली असून तिसऱ्या लाटेची चर्चा सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून वर्ग १ ते वर्ग ७ पर्यंतच्या शाळा बंद आहेत. यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्राथमिक शिक्षण हाच पाया असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करा, अशी मागणी पालकांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शाळा बंद असल्याने शासन ऑनलाइन शिक्षण पद्धतीने प्राथमिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची योजना राबवत आहे; पण ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क बरोबर राहत नाही व वेळेवर लाइटसुद्धा राहत नाही. काही विद्यार्थ्यांचे पालक हे आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे आपल्या पाल्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. शिवाय, ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेतल्यास व वर्गखोलीत शिक्षण घेण्यात फार तफावत आहे. वर्गखोलीत विद्यार्थी ज्या पद्धतीने शिक्षण ग्रहण करतात त्या तुलनेत ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांनाही उत्साह निर्माण होत नाही. परिणामी, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असून प्राथमिक शिक्षण हेच शिक्षण व जीवनाचा पाया ठरते. परिणामी, वर्ग १ ते ७ मधील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होईल. याकडे लक्ष देत फिजिकल डिस्टन्सचे पालन व मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून ५० टक्के उपस्थितीत का होईना ना पण प्राथमिक शाळा सुरू करा, अशी मागणी पालकांनी केली आहे. अन्यथा तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे.
तहसीलदारांमार्फत मागणीचे निवेदन गुरुवारी (दि.९) मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्ष नरेश बोपचे यांच्या नेतृत्वात निवेदन देताना काँग्रेस कमिटी तालुका महासचिव हंसराज जोशी, सचिव नेतराम बघेले, राजू फुंडे, पालक विजय बोपचे, दुर्गाप्रसाद शेंडे, मोरेश्वर रहांगडाले, अमृत बघेले व इतर पालक उपस्थित होते.