टेमणीतील जागाही वांद्यात : १.५० कोटींचा खर्च, भूसंपादन करणे झाले कठीणकपिल केकत गोंदियाघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी गोंदिया नगर परिषदेने निवडलेली टेमणी या गावातील जागा आता वांद्यात दिसून येत आहे. या जागेच्या भूसंपादनासाठी नगर परिषदेला भूमालकांना मूळ रक्कम व त्यावरील व्याज मिळून सुमारे १.५० कोटी रूपये द्यावयाचे आहेत. आजघडीला एवढे पैसे भरण्याची नगर परिषदेची आर्थिक स्थिती नसल्याने आता ही जागाही वांद्यात आली आहे. एकीकडे घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी न्यायालयाकडून मिळालेले कडक निर्देश तर दुसरीकडे पैशाची अडचण अशा कैचीत सापडलेल्या नगर परिषदेला आता ही जमीन संपादन करण्यासाठी सरकारपुढे हात पसरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भूसंपादनासाठी आणखी विलंब झाल्यास जागेची किंमत दीडवरून दोन कोटीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेला घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे गोंदिया नगर परिषदेकडे इतक्या दिवशात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेने सन २००६-२००७ मध्ये तालुक्यातील ग्राम टेमनी येथे ३.५४ हेआर जागा बघितली होती. त्या जागेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. ही जागा कौशल्या गोपलानी, रामदास चक्रवर्ती व भरत सूरजलाल राऊत या तीन जणांच्या मालकीची असल्याने भूसंपादन अधिकारी यांनी सन २०११ मध्ये त्या जागेचा मोबदला ६९ लाख ७१ हजार ५०६ रूपये देण्याचा अंतिम निवाडा दिला होता. यातील आठ लाख रूपये नगर परिषदेने पूर्वीच जमा केल्याने नगर परिषदेला ६१ लाख ७१ हजार ५०६ रूपये भरावयाचे होते. मात्र भूमालक कौशल्या गोपलानी या निवाड्यातील जमिनीच्या ६१ लाख ७१ हजार ५०६ रूपयांच्या मोबदल्याने संतुष्ट नसल्याने त्यांनी सन २०११ मध्ये दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे भूसंपादन प्रकरण कायद्याच्या कमल १८ अंतर्गत वाढीव मोबदल्यासाठी प्रकरण दाखल केले होते. त्या प्रकरणाचा निकाल १५ आॅक्टोबर २०१३ रोजी लागला. त्यात निवाड्यातील ६१ लाख ७१ हजार ५०६ रूपयांच्या मोबदल्यासोबतच १९ लाख २७ हजार ८०० रूपयांचा वाढीव मोबदला, ३० टक्के सोलेशियम राशी व त्यावर आतापर्यंतचे व्याज धरल्यास ती रक्कम आता सुमारे १.५० रुपयांपर्यंत जाते.विशेष म्हणजे नगर परिषदेने त्याचवेळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे महत्व लक्षात घेत ६१ लाख ७१ हजार ५०६ रूपये भरले असते तर प्रकल्पाची जागा नगर परिषदेला एवढी महागात पडली नसती. आजघडीला नगर परिषदेला सुमारे १.५० रूपये जागेसाठी देणे शक्य नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी टेमनी येथील जागाही आता वांद्यात असल्याचा सूर उमटत आहे. नगर परिषदेला शासनाच्या मदतीने निधीची कशीतरी जुळवाजुळव करून ही जागा घ्यावी लागणार असल्याचे येथे स्पष्ट दिसून येते.टेमणीवासीयांचा प्रकल्पाला विरोध सुरूवातील नगर परिषदेकडून टेमणीतील या जागेवरच कचरा टाकला जात होता. मात्र गावातून कचरा नेला जात असल्याने, शिवाय त्यात मेडिकल वेस्टेज असल्यामुळे टेमणीवासीयांनी प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे नगर परिषदेने जवळील ग्राम कटंगी येथील जागा बघितली होती. मात्र एयरपोर्ट अथॉरिटीने ती जागा प्रकल्पासाठी वापरण्यास विरोध केल्याने नगर परिषदेने ग्राम रापेवाडा येथे जागा बघितली होती. रापेवाडातील जागेवर पाणलोट प्रकल्प येत असल्याने नगर परिषदेला या जागेलाही मुकावे लागले होते. शेवटी फिरून नगर परिषदेचा कल पुन्हा टेमनी येथील जागेकडे दिसून येत आहे. यासाठी जागेवर आवारभिंत तयार करून गावाबाहेरून रस्ता काढण्याचा नगर परिषदेचा विचार आहे. आता टेमणीवासी या प्रकरणी काय भूमिका घेतात, हे बघायचे आहे. अनुदानांवर गदा येण्याची शक्यताशासनाकडून नगर परिषदेला विविध अनुदान मिळतात व त्यावरच नगर परिषदेचा कारभार चालतो. यासाठी नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेकडे अद्याप घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने शासनाच्या विविध अनुदानांपासून वंचित राहावए लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषदेला कोणत्याही परिस्थितीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा मुद्दा मार्गी लावणे गरजेचे झाले आहे. यात न.प.प्रशासन हे प्रकरण कसे निकाली काढते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
घनकचऱ्याचे ग्रहण सुटेना
By admin | Updated: December 2, 2015 01:48 IST