नवेगावबांध : शासनाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सर्वंकष माहिती शासनाकडे असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आॅनलाईन करणे गरजेचे आहे. माहितीमध्ये विद्यार्थ्याशी संबंधित सर्वच माहिती समाविष्ट असल्याने ही बाब शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सदर माहिती १५ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन करावयाची आहे. यामध्ये संबंधित सर्वच विद्यार्थ्यांची कौटुंबिक व शैक्षणिक माहिती, रक्तगट, पालकाचे उत्पन्न, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, शिक्षण घेत असलेला भाऊ किंवा बहिणीची माहिती, त्याच्याशी संबंधित प्रमाणपत्र आदी सर्व बाबींच्या नोंदी आॅनलाईन करायच्या आहेत. ग्रामीण भागातील पालक सध्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या पाल्यांचे प्रमाणपत्र मिळविण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील निहीत वेळेत आपापले प्रमाणपत्र सादर करू शकत नाहीत. यामुळे शिक्षकांचा मनस्ताप वाढत आहे. अनेक शाळांमध्ये संगणकाची सुविधा नाही. अशावेळी शिक्षकांनी माहिती कशी अपलोड करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्टफोनवरून देखील माहिती अपलोड करता येऊ शकते. परंतु किती शिक्षकांजवळ स्मार्ट फोन आहेत आणि कितींना तो हाताळता येतो, हा संशोधनाचा विषय आहे. शाळेमध्ये संगणक नसल्यामुळे बहुतेक शिक्षकांना संगणक हाताळता येत नाही. सदर डाटाबेसचे काम युद्धपातळीवर करायचे आहे, असे सांगण्यात येते. परंतु बऱ्याचदा ‘लिंक फेल्यूअर’ किंवा ‘वेबसाईट जाम’ अशा समस्या येतात. त्यामुळे दिलेल्या वेळेत संस्था, शाळा, समित्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची माहिती अपलोड होईल किंवा नाही, याचा ताण शिक्षकांवर आल्याचे सांगितले जाते.सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची माहिती कमी केली असली तरी विहित केलेली माहिती निर्धारित वेळेत अपलोड करण्याची डोकेदुखी वाढली असल्याचे शिक्षण वर्तुळात बोलले जाते. (वार्ताहर)वर्गशिक्षक व मुख्याध्यापकावर जबाबदारी निश्चितविद्यार्थ्यांची माहिती तर आॅनलाईन होणारच, पण शाळेमध्ये ज्या विविध समित्या व समितीच्या सदस्यांसंबंधीची माहितीदेखील आॅनलाईन करायची आहे. स्वत: शिक्षकांचीदेखील शैक्षणिक, व्यायसायिक, सेवाकार्य, प्रशिक्षण आदींची सर्वकष माहिती द्यायची आहे. ही सर्व माहिती गोळा करून आॅनलाईन करणे क्रमप्राप्त आहे. सदर माहिती गोळा करणेच मोठे जिकरीचे काम आहे. या सर्व कामांची शालेय पातळीवर जबाबदारी वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात आलेली आहे.
सरल डाटाबेसने वाढविली शिक्षकांची डोकेदुखी
By admin | Updated: August 10, 2015 01:24 IST