मध्यकाशी कामठा : श्रद्धाळूंच्या स्वैच्छिक स्वयंसेवेतून निर्मितगोंदिया : सृष्टीचे आदिदैवत समजल्या जाणाऱ्या महादेवाचे मध्य भारतात संत लहरीबाबाची कर्मभूमी व ज्ञानभूमी कामठा येथे हर हर महादेव आणि भारतात घर घर महादेवच्या जयघोषात श्री लहरीबाबा आश्रमात जवळ-जवळ १० वर्षे सततच्या बांधकामानंतर १४ डिसेंबर १९९४ मध्ये स्थापन झाले. आता या शिवलिंगाकृती शिवमंदिराचे सौंदर्यीकरण पूर्ण झाले असून भाविकांसाठी आकर्षक व आस्थेचे केंद्र बनले आहे.कामठा क्षेत्र छत्तीसगड, महाकौशल आणि विदर्भाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे कामठा तीर्थक्षेत्रास मध्यकाशी संबोधिले जाते. शिवलिंगाच्या आकाराचे हे मंदिर भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात आपल्या आगळ्या-वेगळ्या बनावटीचे आणि वैशिष्ट्यांचे एकुलते एक मंदिर आहे. हे शिवमंदिर शिवलिंगाच्या आकाराचे असून विशाल जलकुंडातील पाण्यात तरंगत असल्यासारखे वाटते. या शिवमंदिराची उंची ७८ फूट, लांबी ९० फूट व रूंदी ४० फूट आहे. या जलकुंडात आकर्षक फवारे असून त्यातून विद्युत प्रकाशात विविध रंगाच्या पाण्याच्या उडण्याचा भास होतो. या रंगीबेरंगी पाण्याच्या छटा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. रात्रीच्या वेळी विविधरंगी प्रकाशाने सुशोभीत चमकते मंदिर श्रध्दाळूंचे मन आकर्षूण घेते. त्यांना भक्तिमय वातावरणात घेवून जाते व मोहून टाकते. (संगमरवरी) आरसपाणी शुभ्र पांढऱ्या दगडांनी निर्मित मंदिर तीन विभागात सुसज्जीत आहे. पहिला विभाग जमिनीच्या १० फूट खाली बांधलेला असून गर्भगृहात भगवान सदाशिव व माता पार्वतीच्या संगमरवरी दगडांच्या मूर्ती स्थापित आहेत. हे ध्यानयोग मंदिर सर्व बाजूंनी पाण्यात वेष्ठीत आहे. येथे जाण्यासाठी एक आकर्षक पक्का पूल आहे. श्रध्दाळू साधकांना तिथे साधना करण्याची परवानगी आहे. मंदिराच्या द्वितीय खंडात पहिल्या मजल्यावर सहा फूट उंच पाच टन वजनाचे काळ्या दगडाने निर्मित शिवलिंग स्थापित केले आहे. शिवलिंगाच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस अखंड काळ्या दगडांनी निर्मित नंदीची प्रतिमा आपल्या दीड फूट आसनावर विराजमान आहे. मंदिराच्या प्रवेश स्थानावर आकर्षक जलकुंड आहे. जलकुंडात पाय आपोआप धुतले जातात. तेथून पायऱ्या चढून शिवमंदिरात पहिल्या मजल्यावर प्रवेश होतो. मंदिराच्या समोर २२ फूट उंच व १८ फूट लांब भगवान शिवाचे वाहन नंदी आपल्या संपूर्ण साजासहित शुभ्र पांढऱ्या रंगात प्रसन्न व शांत मुद्रेने बसल्या स्थितीत विराजमान आहे. त्याचे उजवे बाजूस पितळेचे मोठे त्रिशूल व डाव्या बाजूस मोठी पितळी घंटा आहे. मंदिराचे सर्व बाजूला, आकर्षक, मनोहारी उद्यान आहे. मंदिराच्या छताला २१६ लघुघंटिका लावल्या आहेत. येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने त्या मधुर, मंत्रमुग्ध करणारा ध्वनी निर्मित करतात. त्यामुळे वातावरण प्रसन्न व भक्तीमय होवून जाते. निर्मळ मनाने मंदिरात जाणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या भक्तांच्या संख्येवरून हे शिवलिंग जागृत असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)मंदिराचे बांधकामही वैशिष्ट्यपूर्णया मंदिराची विशिष्टता अशी की, दोन्ही स्लॅब भक्तांच्या, शिष्यांच्या स्वैच्छिक स्वयंसेवेतून निर्मित आहेत. या कामाकरिता गरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत उच्च-पदस्थ अधिकारी, इंजिनियर, उच्चभ्रू महिला आदींनी बांधकामाच्या मसाल्याचे घमेले देण्याचे काम अविरत १२ तास काहीही न खाता केले. त्यांच्यासोबत त्यांचे प्रेरणास्त्रोत संत श्री लहरीबाबा सकाळच्या सात वाजेपासून सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत खुर्चीवर बसून प्रेरणा देत होेते. अविरत काबाडकष्ट करूनही एकालादेखील भूक लागली नाही की एक कप चहा पिण्याची इच्छा झाली नाही, असे सांगितले जाते. सकाळी ६ वाजता शिड्यावर चढलेले सर्व सेवक सायंकाळी ६ वाजता खाली येत होते. अशा स्वयंस्फूर्त कष्टाचे वर्णन अध्यात्माच्या इतिहासात दुसरे नाही.
शिवलिंगाकृती शिवमंदिर आकर्षणाचे केंद्र
By admin | Updated: September 7, 2015 01:51 IST