लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीतील डॉ.कार्लेकर ते हड्डीटोली रेल्वे चौकी पर्यतच्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाला घेऊन नागरिकांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी ठरले असून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. बुधवारी (दि.४) या रस्त्यावर पुन्हा कोट टाकण्यात आला आहे.डॉ कार्लेकर हॉस्पीटल ते हड्डीटोली रेल्वे चौकी पर्यंत करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करीत सर्व जागरूक शहरवासी या बॅनरखाली नागरिकांनी या रस्ता डांबरीकरणाविरोधात २० फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी आंदोलन केले होते. याशिवाय मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जनप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना निवेदन देऊन रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती.स्वाक्षरी आंदोलनात भाग घेत हजारच्या घरात नागरिकांनी स्वाक्षरी केली होती. या आंदोलनाची दखल घेत जनप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी पाहणी केली होती. तसेच त्यांनी नव्याने रस्त्याचे काम करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. दिलेला शब्द पाळत या रस्त्याचे बुधवारी (दि.४) नव्याने काम करण्यात आले. यात रस्त्यावर नवा कोट टाकण्यात आला आहे.