लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाच देशात सध्या जोमात लसीकरण सुरू आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींद्वारे लसीकरण सुरू आहे. मात्र, कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप आला म्हणजे लस खरी असून तिचा प्रभाव सुरू झाला, तर ताप न आल्यास लस खोटी असून तिचा काहीच फायदा नाही अशा प्रकारचे संभ्रम नागरिक बाळगून आहेत. मात्र, लस घेतल्यानंतर ताप येणारच असे काहीच नसून, प्रत्येकाच्या रोग प्रतिकराक शक्तीवर ते अवलंबून आहे असे म्हणता येईल. मात्र, ताप आल्यावरून लस खरी की खोटी हा केवळ एक संभ्रम आहे. अशात नागरिकांनी हा संभ्रम व लसीकरणाला घेऊन असलेली भीती बाजूला सारून सर्वप्रथम लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करणे गरजेचे आहे.
कोविशिल्डचा त्रास अधिक - कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसींचाच वापर जिल्ह्यात सध्या सुरू आहे. यातही कोविशिल्डचे सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत. यात कोविशिल्डचा जास्त त्रास असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे काहीच नसून, दोन्ही लसी अत्यंत सुरक्षित असून, कोविशिल्डमुळे जास्तीचा काहीच त्रास होत नाही.
लसीनंतर काहीच झाले नाही... कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप येतो असे सांगितले जात असून, कित्येकांना बघितलेही आहे. मात्र, मी लस घेतल्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही. अंगदुखी, डोकेदुखी व ताप अशी काहीच लक्षणे मला दिसून आली नाही. विशेष म्हणजे, दुसरा डोस घेतल्यानंतरही मला काहीच त्रास जाणवला नाही. - जयेश गणवीर
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यावर ताप येतो असे बघितले आहे. मात्र, मी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही मला ताप किंवा अन्य काही त्रास जाणवला नाही. काही लोकांना ताप येतो, मात्र सर्वांनाच येणार असे दिसत नाही. - सुरेश खरे
त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही...लस घेतल्यावर त्रास झाला म्हणजे लस परिणामकारक आहे असे काहीच नाही. दोन्ही लसी अत्यंत प्रभावी व सुरक्षित असून, लवकर प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याची गरज आहे. - डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.