गोंदिया : यावर्षी डेंग्यूच्या डासांचा प्रकोप वाढला नसल्याने या आजाराने अद्याप डोके वर काढलेले नाही. मात्र मलेरिया जिल्ह्यात आपले पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी मलेरियाने एका महिलेचा बळी घेतला असून अनेकांना लागण झाली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप विभागाने फवारणीचा पहिला टप्पा सुरू केला आहे. पावसाळा म्हणजे आजारांसाठी पोषक काळ. या दिवसात डासांचा उद्रेक वाढतो व त्यापासून मलेरिया व डेंग्यूसारखे आजार बळावतात. या डासांमुळेच जिल्ह्यात दरवर्षी मलेरिया व डेंग्यूचा उद्रेक वाढून अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यातही मलेरियाचे प्रमाण जास्त दिसून येते. यावर्षी गेल्या गेल्या सात महिन्यात ४३७ मलेरिया रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात जानेवारी ते जूनदरम्यान ३७७ रूग्ण पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. शिवाय १ जुलै ते २१ जुलै या काळात ३४ हजार ९९१ नमुने घेण्यात आले असून त्यात १६० मलेरिया पॉझिटिव्ह आढळले आहेत. गंभीर बाब म्हणजे, २२ जुलै रोजी मुल्ला (देवरी) आरोग्य केंद्रांतर्गत पहाडीटोला येथील पुस्तकला मुरारी पुसाम (२२) या महिलेचा मलेरियाने मृत्यू झाला. या डासांचा धसका घेत जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात फवारणी मोहिम सुरू केली आहे. दरवर्षी या काळात सदर मोहिमेतून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जातात. यंदाही १ जूनपासून फवारणी सुरू करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यातील ४८९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात ३७१ आदिवासी तर ११८ बिगर आदिवासी गावांचा त्यात समावेश आहे. ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४ लाख ९ हजार ९३८ लोकसंख्येच्या क्षेत्रात फवारणी करून त्यांना सुरक्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ४८९ गावांत होणार फवारणी हिवताप नियंत्रण विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दरवर्षी फवारणी केली जाते. यासाठी गावे निवडली जात असून त्यासाठी विभागाने काही निकष ठरवून दिले आहेत. शिवाय ज्या गावात मागील तीन वर्षात डेंग्यू व मलेरियाने मृत्यू किंवा उद्रेक झाला असेल त्या गावांची निवड प्राधान्याने केली जाते. ठरवून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे या विभागाने यंदा ४८९ गावांची निवड केली आहे. यात आदिवासीबहुल गावांत फवारणी अगोदर उरकली जात आहे.
मलेरिया पसरतोय पाय! एक महिला दगावली
By admin | Updated: July 30, 2016 00:07 IST