गोंदिया : महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन शिक्षिका बनविले. त्यानंतर मुलींसाठी पुण्यात पहली शाळा उघडली. अज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा विवाह, भ्रूणहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण यासाठी सनातन्यांचा विरोध पत्करून पुढाकार घेतला. ते स्त्री शिक्षणाचे खरे व प्रथम उगमस्थान आहेत, असे उद्गार केंद्रप्रमुख डी.एल. गुप्ता यांनी व्यक्त केले. ‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’ या चार वाक्यात शिक्षणाचे महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम सोमवारी जि.प. प्राथमिक शाळा बिरसी (पं.स. आमगाव) येथे पार पडला. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख डी.एल. गुप्ता होते. प्रमुख पाहुणे म्हणून बिरसीचे माजी सरपंच पी.के. चौधरी, राजेंद्र रहांगडाले, सुकचंद पटले व मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलित करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुष्पगुच्छांनी अतिथींचे स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे आपल्या मार्गदर्शनात, प्राथमिक शिक्षण आयोग म्हणजेच हंटर आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीने व मोफत व्हावे यासाठी फुलेंनी इंग्रजांना धारेवर धरले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी संघटना व कामगार संघटनेची स्थापना केली. सर्व विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याला आसुड हा त्यांचा ग्रंथ अवश्य वाचावे, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी दीक्षा पटले तर आभार यश बिसेन याने मानले. कार्यक्रमासाठी वर्षा बावनथडे, एल.एस. कोकुडे, चंद्रकुमार बिसेन यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
स्त्री शिक्षणाचे उगमस्थान म्हणजे महात्मा जोतिबा फुले
By admin | Updated: December 2, 2014 23:09 IST